• Fri. Sep 19th, 2025

कर्णदोष असलेल्या तीन वर्षीय गरजू मुलाला डिजिटल श्रवणयंत्राची मदत

ByMirror

May 23, 2023

पारदे दांम्पत्यांच्या मुलासाठी मंगेश केवळ देवदूतप्रमाणे आले धावून

इतरांचे जीवन आनंदीत करुन आपल्या जीवनात समाधान शोधणारे व्यक्तींमुळे समाज सावरला आहे -आ. अरुण जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वर्षाच्या मुलास जन्मजात असलेली कर्णबधिरता, अठरा विश्‍व दारिद्रय, मुलाला महागड्या श्रवणयंत्राशिवाय शिक्षण व भविष्यातील आनंदी जीवन देण्याचा बिकट प्रश्‍न उभा ठाकलेला असताना पारदे दांम्पत्यांच्या मदतीला मंगेश केवळ देवदूतप्रमाणे धावून आले. कर्णबधिर असलेल्या अभिषेक पारदे या मुलाला साई हेअरिंग क्लिनिक अ‍ॅण्ड साई सर्जिकलच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञानाचे महागडे डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात आले.


आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते पारदे दांम्पत्यांना मुलासाठी डिजिटल श्रवणयंत्र भेट देण्यात आली. यावेळी किशोर डागा, लायन्स मिडटाऊनचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे व पारदे कुटुंबीय उपस्थित होते.


मंगेश केवळ साई हेअरिंग क्लिनिक अ‍ॅण्ड साई सर्जिकलच्या माध्यमातून मागील 32 वर्षापासून कर्णदोष असलेल्यांचे कान तपासून योग्य श्रवणयंत्र उपलब्ध करुन देत आहेत. पारदे दांम्पत्यांच्या तीन वर्षीय मुलाला कर्णदोष असल्याचे निदान झाल्यानंतर त्याला शिक्षण व पुढील जीवन जगण्यासाठी डिजिटल श्रवणयंत्राची गरज होती. हा महागडा श्रवणयंत्र मुलासाठी घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. नुकताच केवळ यांचा मुलगा नितांत केवळ हा लंडन येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये एक वर्षाचा अनुभव घेऊन नगरकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. आपल्या मुलाच्या कामाची सुरुवात सामाजिक कार्याने होण्याच्या उद्देशाने त्यांनी गरजू घटकातील मुलाला डिजिटल श्रवणयंत्र भेट देऊन केली.


आमदार अरुण जगताप यांनी इतरांचे जीवन आनंदीत करुन आपल्या जीवनात समाधान शोधणारे व्यक्तींमुळे समाज सावरला आहे. केवळ यांनी दाखविलेला सेवाभाव प्रेरणादायी असून, एका गरजू मुलाचे उज्वल भविष्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगेश केवळ म्हणाले की, व्यवसाय करताना त्याला सामाजिक बांधिलकी देखील असली पाहिजे. या श्रवणयंत्राच्या माध्यमातून त्या लहान बाळाचे जीवन फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *