युवक-युवतींसह इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मोडी लिपी म्हणजे महाराष्ट्राच्या समृध्द ऐतिहासिक परंपरेचा वारसा -डॉ. संतोष यादव
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा उत्साहात पार पडली. ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला युवक-युवतींसह इतिहासप्रेमी नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील ऐतिहासिक वस्तु संग्रहालयासह मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या चार शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा पार पडली. मोडी लिपी प्रचारार्थ या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. प्रारंभी शहाजी राजे भोसले व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. संतोष यादव, नारायण आव्हाड, आनंद कल्याण, बापू मोढवे, राहुल भोर, गणेश रणसिंग, संतोष दांगडे आदींसह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. संतोष यादव म्हणाले की, मोडी लिपी म्हणजे महाराष्ट्राच्या समृध्द ऐतिहासिक परंपरेचा वारसा आहे. मोडी लिपीशिवाय इतिहासाचा अभ्यास करणे अशक्य आहे. मध्यकालीन काळात या लिपीचा वापर हस्तलिखितासाठी करण्यात येत असे. मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी मोडी लिपी येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तथा ऐतिहासिक वास्तु संग्रहालयाचे अध्यक्ष सिद्धराम सालीमठ व कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धकांनी देवनागरी लिपीतील उतारा सुंदर हस्ताक्षरात मोडीत लिहले. तर शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडीतील कागदाचे मराठीत रुपांतर केले. या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले .
