स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा
मागील पाच वर्षापासून माथाडी कामगारांच्या नोंदणीस टाळाटाळ केली जात असल्याचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून माथाडी कामगारांच्या नोंदणीस टाळाटाळ केली जात असून, अर्ज देऊनही नोंदणी होत नसल्याचा मार्केटयार्ड मधील माथाडी व असंरक्षित कामगार मंडळासमोर स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर त्वरीत एक्साइड कंपनीची पहाणी करुन माथाडी कामगारांची नोंदणी करुन घेण्याचे निवेदन देण्यात आले.
स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटना सन 2017 पासून या प्रश्नावर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाबरोबर पाठपुरावा करीत असून, येत्या 7 दिवसात माथाडी कामगार नोंदणीचा प्रश्न मार्गी न लावल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करुन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया बाहेर कामगारांसह उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे निरीक्षक प्रदीप जगधने यांना निवेदन देऊन या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, दत्तात्रय तापकिरे, पै. सुनिल कदम, दिलीप वाकळे, कंपनीतील कामगार कुमार क्षेत्रे, गणेश टिमकरे, पिंटू सरोदे, योगेश बारस्कर, सोपान कदम, लक्ष्मण गोरे आदी उपस्थित होते.
स्वराज्य माथाडी व जनरल कामगार ही संघटना एक्साइड कंपनीमध्ये नोंदणीकृत असून, कंपनीतील अनेक कामगार संघटनेचे सभासद आहे. यामधील अवघे 10 कर्मचारी माथाडी म्हणून प्रत्यक्षात काम करतात. अजूनही 50 च्या आसपास कर्मचारी माथाडी स्वरूपाचे काम करत आहे. त्यांनाही माथाडी मंडळ मध्ये सभासद करून समाविष्ट करण्यासाठी संघटना अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. मात्र संबंधित कार्यालय कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. केलेल्या पाठपुराव्याला उत्तर देखील दिले जात नाही. कंपनी व माल धक्क्यावर येणारे अधिकारी याबाबत कुठल्याही प्रकारची पहाणी करत नाही. या प्रश्नाकडे संबंधित अधिकारी व महामंडळ डोळेझाक करुन कामगार विरोधी धोरण राबवित असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

संघटनेच्या वतीने माथाडी म्हणून कंपनीत प्रत्यक्षात काम करणार्यांना सभासदत्व मिळण्याच्या न्याय, हक्कासाठी आंदोलनाची तयारी दर्शविण्यात आली आहे. नवीन सभासद करुन घेण्यासाठी या मंडळामार्फत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. माथाडी स्वरूपातला कामगार कोणलाही कायम करण्यात आलेले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
माथाडी स्वरुपाचे प्रत्यक्षात काम करणार्या कामगारांची नोंद करुन त्यांना कायद्याचे संरक्षण देणे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाची आहे. मात्र हे महामंडळच कामगार विरोधी धोरण राबवून कामगारांकडे डोळेझाक करीत आहे. मागील 5 वर्षापासून अर्ज देऊनही कामगारांची माथाडी म्हणून नोंदणी केली जात नाही. एक्साइड कंपनीत अवघे 10 माथाडी सदस्य असून, अनेकांच्या नोंदी प्रलंबीत आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण एमआयडीसीमध्ये असून, या प्रश्नावर कामगारांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. -योगेश गलांडे (अध्यक्ष, स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटना)
