• Thu. Jan 22nd, 2026

उमेद फाउंडेशनचा गरजूंना शैक्षणिक साहित्य व सुंदर हस्ताक्षरासाठी सुलेखन वही वाटपाचा उपक्रम

ByMirror

Jul 9, 2023

उमेदने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांमध्ये उमेद निर्माण केली -मा.खा. प्रसाद तनपुरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद फाउंडेशनच्या वतीने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सुंदर हस्ताक्षरासाठी सुलेखन वही वाटपाचा उपक्रम सुरु आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे यांनी दिली.


या अभियानांतर्गत उमेद फाउंडेशनच्या वतीने बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या राहुरी फॅक्टरी येथील नुतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सुलेखन वह्यांचे वाटप माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सचिव सचिन साळवे, खजिनदार संजय निर्मळ , सल्लागार अ‍ॅड. दिपक धिवर, प्रदिप बागूल, योगेश घोलप, विजय लोंढे, मुकुंद काकरे, शिवाजी कपाळे, आबा वाळूंज, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनिल विश्‍वासराव, देना बँकेचे व्यवस्थापक तुपे, मुख्याध्यापिका सुनिता साळी, मकरंद गोलांडे, भारत पवार, योगेश दिघे, ममता निमसे, कवाने आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात अनिल साळवे म्हणाले की, कोरोनानंतर अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांपुढे रोजचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गरजू घटकातील विद्यार्थ्यांना उमेद देण्याचा प्रयत्न फाऊंडेशनने केला असून, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची व विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी सुलेखन वह्यांचे वाटप सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की, उमेद फाऊंडेशनने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांमध्ये उमेद निर्माण करण्याचे कार्य केले. समाजाची खरी गरज ओळखून राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोना काळात लेखनाकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जेजुरकर यांनी केले. आभार प्रदिप तनपुरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *