अन्यथा भाजपने निवडणुकांमध्ये पेन्शन धारकांना गृहीत धरु नये!
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घालून देण्याचे पद्मश्री पवार यांचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या मागण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत चर्चा करुन संघटनेची भविष्यात दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.8 नोव्हेंबर) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकित ईपीएस 95 पेन्शन धारकांची पेन्शन वाढसह इतर मागण्यांसाठी पुन्हा 7 व 8 डिसेंबर रोजी दिल्लीला देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली असून, या आंदोलनात पूर्ण ताकतीने उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ईपीएस 95 पेन्शन धारकांचे प्रश्न सोडवून मागील आठ वर्षापासून सुरु असलेला संघर्ष थांबवावा, अन्यथा पुढील निवडणुकांमध्ये पेन्शन धारकांना गृहीत न धरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकिसाठी अध्यक्ष एस.एल. दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष बाबूराव दळवी, एम.एस.ई.बी. संघटनेचे अध्यक्ष अॅड. गोकुळ बिडवे, भाऊसाहेब पावसे, श्रीकांत देशमुख, बंडेराव कुलकर्णी, ओबीसी संघटनेचे अनिल ठुबे, एमआयडीसी कामगार संघटनेचे भाऊसाहेब इथापे, एसटी संघटनेचे देवराम ताकपेरे आदींसह जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शन धारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुभाष कुलकर्णी म्हणाले की, ईपीएस 95 पेन्शनधारकांना साखर कारखान्यांसह इतर कामगारांना बरोबर घेऊन एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे. ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या प्रश्न भाजप सरकारने सोडवावा अन्यथा पुढील निवडणुकांमध्ये त्यांना गृहीत धरू नये. दिल्ली येथे होणार्या देशव्यापी आंदोलनात केंद्रीय कामगार मंत्री यांच्याकडे संघटनेची भूमिका मांडण्यात येणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबतही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा चेंडू पुन्हा केंद्राच्या दरबारी टोलवला गेला आहे. आंदोलन तीव्र करुन मागण्या पदरात पाडून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अर्थ काढावा लागणार असून, यामुळे काम अजून वाढले आहे. निकालाने नाराज होऊन चालणार नाही व हुरळून जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

एस.एल. दहिफळे यांनी 2014 पासून ईपीएस 95 पेन्शनधारक आंदोलन करत असून, केंद्र सरकारने त्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालानंतर हा प्रश्न अजून किचकट बनला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाबूराव दळवी यांनी ईपीएस 95 पेन्शनधारकांना आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. 72 लाख पेन्शनर्स व 5 कोटी कामावर असलेले कामगार व यांच्या कुटुंबांचे मतदान पुढील लोकसभेला निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी पेन्शनर्सच्या बैठकिला भेट देऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांची शिष्टमंडळाने शासकीय विश्राम गृह येथे भेट घेतली असता, लोखंडे यांनी दिल्ली येथे होणार्या आंदोलनात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून देण्याची मागणी केली.