• Sat. Mar 15th, 2025

आयटीआय महाविद्यालयात जिल्हास्तरीय जी 20 परिषदेत विकासात्मक मुद्दयांवर चर्चा

ByMirror

Mar 1, 2023

युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

समतोल राखून विकास शक्य -प्रा. डॉ. एच.एम. शिरसाठ

अहमदनगर (प्रतिनिधी)- समतोल राखून विकास शक्य आहे. मानवी जीवन आनंददायी व आरोग्यदायी राहण्यासाठी तसेच मूलभूत गरजा भागविण्यासाठी सर्व क्षेत्रात समतोल राखण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या, शेती, पर्यावरण, बेरोजगारी, रोगराई आदी विविध प्रश्‍नांमुळे उद्योग, व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था कोलमडून जात असल्याचे प्रतिपादन कृषीतज्ञ तथा विखे पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एच.एम. शिरसाठ यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जय युवा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एक दिवसीय जी 20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. शिरसाठ बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या परिषदेचे उद्घाटन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोपाला पाणी अर्पण करुन करण्यात आले.

कासा मनुष्यबळ विकास केंद्रातील महाराष्ट्राचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य खालीद जहागीरदार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा बँकेच्या महिला विकास अधिकारी विद्या तन्वर, शासनाचा जिल्हा आदर्श युवा पुरस्कार विजेते अ‍ॅड. महेश शिंदे, जय युवाच्या संचालिका जयश्री शिंदे, रयतचे पोपट बनकर, उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक दिनेश शिंदे, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जयेश शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


सुनील गायकवाड म्हणाले की, जी 20 हा विषय भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 20 देशांच्या संघाचे यजमानपद भारताला मिळाले असून, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. वसुदैव कुटुंब ही संकल्पना राबविण्याचा मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून सर्वांनी सामुहिकपणे संकटांना समोर जाणे म्हणजे जी 20 ची संकल्पना आहे. प्रत्येकाने विकासाच्या मुद्दयावर एकत्र येऊन काम करणे म्हणजे जी 20 होय. एक देश एक परिवार ही व्यापक संकल्पना सर्वांमध्ये रुजवून, बलशाली भारतदेश घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.


विद्या तन्वर यांनी अर्थ विकासासाठी बँकाचे धोरण, महिला सक्षमीकरणासाठी बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारे बचत गटांना आर्थिक सहाय्य, आर्थिक सक्षम कौटुंबिक जबाबदारीसाठी हातभार लावण्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना स्पष्ट केल्या. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शिवाजी खरात यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, आरती शिंदे, जयश्री शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले. आभार आयटीआयचे शिल्पनिदेशक जालिंदर खाकाळ यांनी मानले.


परिषदेत आयटीआयच्या युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक दिनेश शिंदे, शिल्पनिदेशक बबन जाधव, श्रीपाद कुलकर्णी, व्ही.एस. त्र्यंबके, पी.जे. कल्हापूरे, पानसरे सर, खैरनार सर, खताडे, जयेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *