• Fri. Mar 14th, 2025

आयटीआय महाविद्यालयाच्या आवारात वृक्षरोपण

ByMirror

Jun 30, 2023

माळी महासंघ व क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम, महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग

पर्यावरण संवर्धनातून शाश्‍वत विकास साधला जाणार -भगवान फुलसौंदर

अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. पर्यावरण संवर्धनातून शाश्‍वत विकास साधला जाणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षरोपण करुन मनुष्याच्या भावी पिढ्या सुखी व आनंदाने जगू शकणार असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.


माळी महासंघ व क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुरुडगाव रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) महाविद्यालयाच्या आवारात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर फुलसौंदर बोलत होते. यावेळी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, शहराध्यक्ष नितीन डागवाले, उपाध्यक्ष विवेक फुलसौंदर, कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाने, उद्योजक आघाडीचे शहराध्यक्ष सचिन एकाडे, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गोंधळे, सागर कोल्हे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य खालिद जहागीरदार, गट निदेशक के.बी. टेकाळे, ए.एस. वाघ, शिल्पनिदेशक खाकाळ, गोंधळे, भवार, थोरात, पंचमुख आदी शिक्षक व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.


पुढे फुलसौंदर यांनी समाजसेवेला वृक्षरोपणाची जोड मिळाल्यास पर्यावरण संवर्धन होणार असल्याचे स्पष्ट करुन या उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष गणेश बनकर यांनी हिरवाईने जीवनाचे व परिसराचे नंदनवन फुलणार आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नामुळे सजीवृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले असून, भविष्यातील धोके टाळण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. महाविद्यालयीन युवकांमध्ये वृक्षरोपण व संवर्धन चळवळ रुजविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


प्राचार्य खालिद जहागीरदार म्हणाले की, युवकांनी योगदान दिल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी युवकांचा पर्यावरण चळवळीत सक्रीय सहभाग आवश्यक आहे. महाविद्यालयात फक्त वृक्षरोपण न करता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील विद्यार्थी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित पाहुणे व विद्यार्थ्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *