• Sat. Nov 22nd, 2025

आनंदधाम ते अहिंसा चौक मार्गावर गतीरोधक बसविण्याची मागणी

  • Home
  • आनंदधाम ते अहिंसा चौक मार्गावर गतीरोधक बसविण्याची मागणी

भरधाव वाहने, वाढते अपघात नागरिक त्रस्त;


सिमेंट रस्त्यावर वेगाची ससेहोलपट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदधाम परिसर ते अहिंसा चौक दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिमेंट काँक्रीटीकरण झालेल्या या रस्त्यावर वाहने प्रचंड वेगाने धावत असल्याने पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला असून, नागरिकांकडून रस्त्यावर गतीरोधक बसविण्याची मागणी होत आहे.


या परिसरात जैन समाजाची आनंदधाम आणि उज्वल नगर येथे अशी दोन महत्त्वाची धर्मस्थाने आहेत. या धार्मिक स्थळांमधून साधू-साध्वी नियमित पायी मार्गक्रमण करत असल्याने भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात. मात्र वाढत्या वेगामुळे पायी फिरणाऱ्यांना रस्ता ओलांडणेच कठीण झाले आहे.


विशेष म्हणजे, महाविद्यालयीन तरुणांमध्ये रात्री आणि पहाटे वेगाची स्पर्धा सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दुचाकी आणि चारचाकीवरील ‘रेसिंग’मुळे रस्त्यावर भीतीचे वातावरण कायम आहे. परिणामी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. काहींना वेगाने येणाऱ्या वाहनांनी उडवल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दर महिन्याला लहान-मोठे अपघात नोंदवल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार आणि महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.


या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर आणि आवश्‍यक ते सुरक्षा उपाय बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी अमोल पोखरणा, जितू पोरवाल, संजय वखारिया, सुरज अग्रवाल, सिद्धेश फुलसौंदर, राजेश मुथा, गोविंद दरक, सुभाष राऊत, सिद्धार्थ शेलार, प्रीतम गांधी, विजय मुथा, नितीन आव्हाड, सचिन डुंगरवाल, दिनेश मुनोत, दीपक बोरा, दिलीप बोरा, पंकज गांधी, लाभेश चोपडा, सागर कायगावकर आदी नागरिक प्रयत्नशील आहे. स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरातील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.