केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी महापालिकेत आक्रोश
पंधरा दिवसात पाणी प्रश्न न सुटल्यास कायनेटिक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, कायनेटीक चौक प्रभाग 17 मधील परिसरात सहा महिन्यापासून पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना, मागील 11 दिवसापासून नळ व टँकरद्वारे देखील पाणी मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी (दि.24 मार्च) महापालिकेत माठ फोडून आंदोलन केले. महिलांनी रिकामे हांडे वाजवत आयुक्तांना घेराव घालून तातडीने पाणी मिळण्याची मागणी केली. तर नागरिकांनी पाणी मिळण्यासाठी यावेळी जोरदार निदर्शने केली.
प्रभाग 17 चे नगरसेविका लताताई शेळके, नगरसेवक राहुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सुनील पवार, साहेबराव सुपेकर, सुरज कोतकर, रवींद्र शिंदे, सुरज शेळके, किसन आहेरकर, आप्पा निकाळजे, राजू तांबोळी, गोरख जाधव, दिगंबर तिजोरे आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
केडगाव, कायनेटीक चौक परिसराच्या प्रभाग क्रमांक 17 मधील रविश कॉलनी, सारस कॉलनी, प्रियंका कॉलनी, आव्हाड विटभट्टी, छायानगर, लक्ष्मीकृपा नगर, अजय गॅस गोडाऊन मागील परिसर, इंदिरानगर, विद्यानगर, हनुमान नगर, सुखकर्ता कॉलनी, सुभद्रानगर, डिंमळे मळा या परिसरात गेल्या सहा महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मागील अकरा दिवसापासून नळाद्वारे व टँकरद्वारे पाणी मिळाले नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. सदर परिसरात सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक राहत असल्याने त्यांना दररोज पाणी विकत घेणे परवडत नाही. या भागातील पाण्याचा प्रश्नाबाबत वारंवार तक्रारी करुन देखील महापालिका प्रशासनाच्या वतीने त्याची दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

नळाद्वारे पुरेश्या दाबाने स्वच्छ पाणी येत नाही, फेज टू ची पाईपलाईन घरापर्यंत जोडली मात्र त्यातून पाणी कधी येणार?, पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते, लहान मुले दूषित पाण्याने आजारी पडत आहे, संबंधित अधिकार्याकडून उडवाउडवीचे उत्तरे, स्थानिक ठिकाणच्या हॉटेलला पूर्ण दाबाने पाणी मात्र नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, असे अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या समोर केली. नगरसेविका लताताई शेळके यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्तांपुढे हात जोडले.
आयुक्त डॉ. जावळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे परिमल निकम यांना बोलावून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सूचना केल्या. या भागातील नागरिकांसाठी दोन टँकर वाढवून देण्याचे व त्वरीत पाण्याचे टँकर पाठविण्याचे आणि पंधरा दिवसात फेज टू ची लाईन सुरु करुन देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सदर परिसरातील पाणीपुरवठा पंधरा दिवसात सुरळीत न झाल्यास कायनेटिक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.