अरणगाव येथे झालेल्या बैठकित कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा
मेहरबाबांची शिकवण व माणुसकीचे विचार समोर ठेऊन कामगारांना न्याय द्यावा -अॅड.कॉ. सुधीर टोकेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची बैठक अरणगाव येथे पार पडली. या बैठकित नवीन पगार वाढीचा करारावर चर्चा करुन हा करार ट्रस्ट व युनियनच्या सकारात्मक चर्चेतून सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या कराराची मुदत एप्रिल 2023 मध्ये संपत असून, नवीन करारासाठी लवकरच ट्रस्टची चर्चा करण्याच्या पार्श्वभूमीवर युनियनची प्राथमिक बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. लाल बावटेचे सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकप्रसंगी युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, खजिनदार प्रभावती सदस्य पाचारणे, सुनिल दळवी, अनिल फसले, सुभाष शिंदे, प्रवीण भिंगारदिवे, राधाकिसन कांबळ,े सुनीता जावळे आदींसह युनियनचे सदस्य असलेले कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार म्हणाले की, मागील काही वर्षात कामगारांच्या एकजुटीने करार होऊन कामगारांना चांगले वेतन मिळाले व कामगार कायद्याप्रमाणे सुविधा प्राप्त झाल्या. ही युनियनच्या एकजुटीची ताकद आहे. हा करार संपत असताना पुढील करारात देखील कामगारांना चांगला पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना अमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, पूर्वीच्या दोन करारासाठी कामगारांना ट्रस्टशी मोठा संघर्ष करावा लागला. हा करार ट्रस्टने तडजोडीने सोडवावा. कामगारांनी देखील अवास्तव मागणी न ठेवता रीतशीर आपला पगार वाढवून घ्यावा. कामगार कायद्याप्रमाणे सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी युनियन प्रयत्नशील राहणार आहे. युनियन फोडण्यासाठी कामगारांमध्ये फूट पाडण्यात आली, मात्र कामगारांनी एकजुटीने याचा बिमोड केला. मेहरबाबांची शिकवण व माणुसकीचे विचार समोर ठेऊन कामगारांना न्याय मिळावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील कामगारांच्या वतीने उमेदवार देण्याचे त्यांनी सुतोवाच केले. महिलांच्या प्रश्नांसाठी विशिष्ट बैठक घेऊन ट्रस्टपुढे हे प्रश्न मांडण्याबाबत चर्चा करण्यात आली.