• Fri. Jan 30th, 2026

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची पारनेर पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार

ByMirror

Feb 9, 2023

पोलीस स्टेशन आर्थिक तडजोडीचा अड्डा बनला असल्याचा आरोप

कामकाजाची चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमानी कारभार व पदाचा दुरुपयोग करून आर्थिक हितासाठी सर्वसामान्य ग्रामस्थांना त्रास दिला जात असल्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर पोलीस निरीक्षका विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली. तर पोलीस स्टेशन आर्थिक तडजोडीचा अड्डा बनला असल्याचा आरोप करुन संबंधित पोलीस अधिकारी यांच्या कामकाजाची चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची मुख्यालयात बदली करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तक्रार अर्जावर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, प्रशांत ठुबे, युवराज बर्डे, रवींद्र क्षीरसागर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


पारनेर पोलीस निरीक्षक हजर झाल्यापासून पारनेरमध्ये घरफोड्या, चोरी व अवैधधंदे वाढले आहेत. ते पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने अवैध धंद्यावाल्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून, मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करत आहे. विविध प्रकरणात नागरिकांना आरोपीसारखे पोलीस स्टेशनला आणून, कायद्याचा धाक दाखवून त्यांना मारहाण करुन त्यांना आर्थिक तडजोडीला भाग पाडले जात आहे. तसेच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच आर्थिक हितसंबंध पाहणारे कर्मचारी ताबडतोब जाऊन आरोपीला धाक दाखवून पैसे घेऊन जातात. पोलीस निरीक्षक यांचा खाजगी ड्रायव्हर नेहमी पोलीस स्टेशनच्या आवारात व पोलीस स्टेशनमध्ये देखील लुडबुड करत असतो. याबाबत पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे तक्रार अर्जात म्हंटले आहे.


पोलीस निरीक्षक व त्यांचे निकटवर्तीय कर्मचार्‍यांचे गुन्हेगारांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीसांबद्दल भीती निर्माण झाली आहे. या भीतीपोटी अवैधधंद्यांच्या विरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाही. वनकुटे येथील बबन बर्डे, पोखरी येथील समशुद्दीन हुसेन सय्यद व एका माजी सैनिकाला किरकोळ प्रकरणात पोलीस स्टेशनला आणून, मारहाण करून गुन्हे दाखल करण्यासाठी धमकाविण्यात आले. चोरी, दरोडे या सारख्या गुन्ह्यांचा तपास बाजूला ठेवून आर्थिक हितसंबंध साधण्यासाठी पोलीस स्टेशनला किरकोळ प्रकरणातील ग्रामस्थांना आणून त्यांच्या जवळच्या लोकांशी संपर्क करुन पैश्याची मागणी केली जात आहे. गुन्ह्यात अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित न झाल्यास गुन्ह्यातील आरोपीस मारहाण करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तर पोलीस निरीक्षक यांच्या जवळचे कर्मचारी फक्त एवढ्याच कामापुरते पोलीस स्टेशनला काम करत आहे? हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.


अवैधधंद्याविरोधात तक्रारी करूनही कुठलीही कारवाई केली जात नाही. या प्रकरणात अवैध धंद्यावाल्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडितांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *