• Thu. Jan 22nd, 2026

अनाथ आश्रमातील मुलांना छत्र्यांची भेट

ByMirror

Jul 11, 2023

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सामाजिक उपक्रम

अनाथ, निराधारांच्या जीवनात आनंद फुलविणे हा देखील परमार्थ -ह.भ.प. कृष्णानंद महाराज

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील मुलांना छत्र्यांची भेट दिली. रंगीबिरंगी छत्र्यांची भेट मिळाल्याने मुल-मुलींच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य फुलले होते.


बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील मुल-मुली धार्मिक शिक्षणासह शालेय शिक्षण घेत असून, पावसाळ्यात त्यांचे संरक्षण होण्यासाठी भालसिंग यांनी स्वखर्चाने त्यांना छत्र्या उपलब्ध करुन दिल्या. यावेळी आश्रमचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. कृष्णानंद महाराज, उपाध्यक्ष प्रकाश मेहेत्रे, सचिव ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली आढाव, व्यवस्थापिका निकिताताई आढाव, संचालिका राणीताई मेहेत्रे आदी उपस्थित होत्या.


ह.भ.प. कृष्णानंद महाराज म्हणाले की, अनाथ, निराधारांच्या जीवनात आनंद फुलविणे हा देखील परमार्थ असून, माणुसकीच्या भावनेने त्यांना आधार देण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग अनाथ आश्रमातील मुलांना मायेने जवळ करुन त्यांच्यासाठी राबवित असलेले विविध उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यांची आश्रमाला सातत्याने सहकार्य मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


विजय भालासिंग म्हणाले की, अनाथ मुले समाजातील एक घटक असून, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. या आश्रमात आई-वडिल नसलेल्या मुलांचा उत्तम प्रकारे सांभाळ केला जात असून, या वंचित घटकातील मुलांसाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे.


श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात पंचवीस मुला-मुलींचा सांभाळ केला जात आहे. शासनाचा कुठलाही अनुदान नसताना ह.भ.प. कृष्णानंद महाराज किर्तन प्रवचन सेवेतून अनाथ मुलाचे उज्वल भविष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत. शालेय शिक्षण व धार्मिक शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचे कार्य सुरु आहे. नुकतेच श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर भीक मागणार्‍या मुलांना देखील शिक्षणासाठी व त्यांच्या पालन पोषणसाठी या आश्रमात भरती करुन घेण्यात आले असल्याची माहिती सचिव ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली आढाव यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते भालसिंग अनाथ मुलांसाठी निस्वार्थ भावनेने देत असलेल्या योगदानाबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *