सर्वसामान्यांची मुले घडविणाऱ्या शिक्षकांचा नगरसेविकेने केला सन्मान
शिक्षक हाच समाजाचा दीपस्तंभ -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर सर्वसामान्यांच्या मुलांना विविध उपक्रमातून हसत खेळत शिक्षण देवून त्यांना घडविणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, योगिता वाघमारे अहिल्या सांगळे यांचा नगरसेविका दिपाली बारस्कर व नितिन बारस्कर यांनी सत्कार केला.
राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना जीवनात शिक्षकांचे महत्त्व विशद करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या भाषणातून समाज घडविणाऱ्या शिक्षकाची महती सांगितली.

नगरसेविका दिपाली बारस्कर म्हणाल्या की, शिक्षक हा भावी पिढीमध्ये संस्कार व सामाजिक मुल्य जिवंत ठेवणारा प्रवाह आहे. चार भिंतीच्या आत पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जगात भरारी घेण्यासाठी पंखात ज्ञानरुपी बळ देण्याचे कामही शिक्षकच करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, शिक्षकांना सर्वच क्षेत्रात सन्मानाची वागणुक मिळते. हे त्यांच्या कार्याची पावती आहे. शिक्षकांच्या कार्यातून भारताचे उज्वल भवितव्य घडत आहे. शिक्षक हाच समाजाचा दीपस्तंभ असून, राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या.