महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला.
यावेळी शेख यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ यांच्याकडे अनामत रकमेसह अर्ज सुपुर्द केला. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब भंडारी, श्यामराव वागस्कर, अभिजीत कांबळे, भूषण चव्हाण, सागर इरमल आदी उपस्थित होते.
मोसीम शेख म्हणाले की, शहर विधानसभेसाठी काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजातील युवा उमेदवाराला संधी द्यावी.लोकसभेत अल्पसंख्यांक समाजाची मते निर्णायक ठरली. हा समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे राहिला असून, या समाजातून नेतृत्व दिल्यास त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची भूमिका मांडून उमेदवारी देण्याची मागणी शेख यांनी केली आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यास मतदार संघातील काँग्रेसचे युवक एकवटणार असल्याची भावना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.