आदेश असूनही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक
नगर (प्रतिनिधी)- प्रशासकीय आदेश होऊन देखील पाथर्डी तालुक्यातील मौजे येळी गावात मातंग वस्तीत मूलभूत सुविधा देण्यात आले नसल्याने, तातडीने मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान व सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले.
दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, दिलीप सोळसे, बंडू पाटोळे, कडू बाबा लोंढे, पोपटराव पाथरे, पांडुरंग घोरपडे, अनिल गायकवाड, संदीप कापडे, सुरेश सोळसे,भास्कर शेलार, सुनील सकट, प्रकाश सोळसे, शोभा सोळसे, आशा सोळसे, ज्योती साठे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपोषणाला दलित महासंघ, भारतीय लहुजी सेना यांसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.
पाथर्डी तालुक्यातील मौजे येळी गावात मातंग समाजाची वाढती लोकसंख्या पाहता जागेची मागणी असल्यामुळे जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. सार्वजनिक फिरते शौचालय ग्रामपंचायतने खरेदी करून देखील ते कुठल्याही विशिष्ट जागेवर बसवले नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर असून, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. मातंग वस्तीवर कुठल्या प्रकारची लाईट सुविधा, सौर ऊर्जा व्यवस्था करण्यात आलेली नसून, वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या संदर्भात पाथर्डीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायतला सुविधा देण्याचे आदेश काढले असताना देखील मुलभूत सुविधांपासून जाणीवपूर्वक मातंग समाजातील वस्त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे म्हंटले आहे. या प्रश्नाची दखल न घेतल्यास 28 जुलै रोजी दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेत मागासवर्गीय ग्रामस्थांसह धरणे आंदोलन करण्याचा इशारा नामदेव चांदणे, काशिनाथ सुलाखे पाटील आणि दिलीप सोळसे यांनी दिला आहे.