राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना पंधरवड्यात पूर्ण करण्याचे आदेश
नगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण हायवे एन एच 61 वर सुरू असलेल्या कामांमध्ये आणि भाळवणी (ता. पारनेर) येथील अतिक्रमण प्रकरणी भाजप कामगार मोर्चाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करून आंदोलनाची तयारी दर्शवली होती. मात्र, प्राधिकरणाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी लेखी पत्र देत आंदोलनापासून परावृत्त केले. हे पत्र भाजप कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस रघुनाथ आंबेडकर यांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी देवेंद्र गावडे, बाबासाहेब डोळस, जगदीश आंबेडकर, समर्थ गावडे, धनंजय शिंदे, हरेश्वर साळवे, सुजित आंबेडकर, अशोक लकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकल्प संचालक पंदरकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रस्त्याची पाहणी करून ठेकेदारांना पुढील पंधरा दिवसांत अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाळवणी येथील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण पुढील दोन महिन्यांत हटवण्यात येणार आहे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे भाळवणी येथील कापरी नदीच्या पूर रेषेच्या आत आणि भाळवणी गावाच्या हद्दीतील जुन्या शेतकऱ्यांनी नियमबाह्य बेकायदेशीरपणे नदीलगत जमिनीवर वहिवाट करून अतिक्रमणे केली आहेत. शासन निर्णयानुसार त्वरित अतिक्रमणे हटवण्याची तक्रार देखील जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. यावर तक्रारीचे अवलोकन करून त्या अनुषंगाने नियमोचित कारवाई करून केलेल्या कारवाईबाबत तक्रारदाराला अवगत करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय गृह शाखेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक यांना पत्र काढले आहे.
रघुनाथ आंबेडकर यांनी सांगितले की, लेखी आश्वासन मिळाल्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी दिलेले पत्र असमाधानकारक आहे. भाळवणीतील अतिक्रमणाबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा असलेली साईड पट्ट्या, मुरुम भराव, व वाढलेली झाडे-झुडपे त्वरित हटवण्यात यावीत. या दुर्लक्षामुळे वारंवार अपघात होत असून, लवकरच ठोस कारवाई न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.