• Sat. Aug 30th, 2025

अवयवदानचा जागर करुन जागतिक अवयवदान दिवस साजरा

ByMirror

Aug 13, 2025

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांनी भरले अवयवदानाचे संकल्पपत्र


अवयवदान मानवी मुल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक -जालिंदर बोरुडे

नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने अवयवदानचा जागर करुन जागतिक अवयवदान दिवस आणि अवयवदान जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. नागरदेवळे (ता. नगर) येथे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरून दिले.


जालिंदर बोरुडे यांनी ग्रामस्थांना नेत्रदान आणि अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. बोरुडे म्हणाले की, आज देशभरात हजारो रुग्ण नेत्र व विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान होत नसल्याने ही प्रतिक्षा वाढत चालली आहे.

एका व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक व्यक्तींना नवीन जीवन मिळू शकते. अवयवदान ही फक्त वैद्यकीय गरज नसून, ती मानवी मुल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. शरीर नश्‍वर असले तरी, मृत्यूनंतर केलेले अवयवदान एखाद्याच्या जीवनात प्रकाश व आनंद आणू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.


फिनिक्स फाऊंडेशनने आत्तापर्यंत 63 हजार लोकांकडून नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प अर्ज भरून घेतले आहेत. हे अर्ज जिल्हा रुग्णालय तसेच विविध नेत्रपिढीत जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत 430 लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले असून, त्यातून 860 लोकांना नेत्ररोपणाद्वारे नवी दृष्टी मिळाली आहे. तसेच अवयवदानातून 48 व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अवयवदानाविषयीची भीती व गैरसमज दूर करण्याचे काम केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *