अंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी, व्यापारी व कामगार वर्गाचे प्रपंच अवलंबून आहे. या बाजारपेठेत चांगल्या पध्दतीने रस्ते उपलब्ध करुन व्यापारीकरणाला चालना देण्याचे काम करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करुन निधी मिळवावा लागतो, तर दूरदृष्टी ठेवून विकासात्मक व्हिजनने रस्त्याचे मोठ्या प्रमाणात काम मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात व नेप्ती उपबाजार समितीमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल बाजार समिती मधील व्यापाऱ्यांच्या वतीने आमदार जगताप यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दि भाजीपाला कांदा फळ फळावळ आडत्यांची असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, कांदा व्यापारी नंदकुमार बोरुडे, उपाध्यक्ष सुनिल विधाते, संचालक अशोक निमसे, संतोष म्हस्के, राजूशेठ बोथरा, संतोष ठोकळ, मोहन गायकवाड, कल्याण वाळके, संतोष सूर्यवंशी, पंकज कर्डिले, दिलीप ठोकळ, अभिजीत बोरुडे, राहुल जाधव, किशोर बोडखे, गणेश लालबागे, पिनूशेठ कानडे, पांडू शिंदे, नंदकिशोर शिकरे आदी बाजार समिती मधील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, शहरातील बाजार समिती व नेप्ती उपबाजार समितीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरु असते. तर शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते, येथील रस्त्याचा प्रश्न लक्षात घेवून ते मार्गी लावण्यात आले. शेतकरी वर्गाला सांभाळून प्रामाणिकपणे व्यापारी आपला व्यापार करत आहे. चांगल्या पध्दतीने कार्य सुरु असलेल्या बाजार समितीत येवून काहींनी अनाधिकृत गाळे बांधल्याच्या तक्रारी केल्या. ज्या व्यक्तींना घरात किंमत नाही, अशा तक्रारदारांच्या तक्रारी या समाज हितासाठी नव्हे, तर स्वत:च्या हितासाठी होत्या. त्यामुळे त्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर राज्य सरकारकडून शहराच्या विकास कामासाठी 150 व 94 कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यात आणण्यात आला. या निधी मधील कामांची टेंडर प्रोसेस होऊन लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे. केडगाव येथील अर्चना हॉटेल ते नेप्ती उपबाजार समिती पर्यंत 21 कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. शहर हद्दीतील सर्वात लांब असलेल्या पुणे ते कल्याण लिंक रोड या 48 कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम होत असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
सभापती भाऊसाहेब बोठे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापार दळण-वळणावर आधारलेला आहे. यासाठी रस्ते चांगले असणे आवश्यक असून, यादृष्टीकोनाने माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी बाजार समितीमधील अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मंजूर करुन विकासांना चालना दिली आहे. यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले. बाजार समितीच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल सर्व व्यापारी वर्गाच्या वतीने संतोष सुर्यवंशी यांनी आभार मानले.
