सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व महिला दिनाचा काळजापार बहुउद्देशीय विकास संस्थेचा उपक्रम
गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी महत्त्वाची -कविताताई नेटके
नगर (प्रतिनिधी)- काळजापार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने पारगाव मौला (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व महिला दिनानिमित्त पंचक्रोशीतील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कविताताई नेटके, डॉ. सतीश काळे, डॉ. स्वाती काळे, डॉ. संतोष गिऱ्हे, पारगावचे सरपंच वैभव बोठे, अमोल खेडकर, गोरख अमृत, शरदराव हिंगे, अनिल बर्डे, रमेश नवगिरे, उषा काळे, वृषाली उमाप, गौरी नेटके, कलाबाई नेटके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कविताताई नेटके म्हणाल्या की, गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. महिला या कुटुंबाचा कणा असून, त्यांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांना विविध तपासण्यासाठी शहरात जावे लागते. या खर्चिक गोष्टी व वेळ अभावी त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांना वाडी-वस्तीवर आरोग्य सुविधा देण्याचे काम शिबिराच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच वैभव बोठे यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांना आधार देण्यासाठी गावात काळजापार बहुउद्देशीय विकास संस्थेने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गावातील महिलांची विविध आरोग्य तपासणी करुन त्यांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. बाळासाहेब नेटके यांनी आभार मानले.