काळ बदलला असून, मुलींप्रमाणे मुलांना देखील जपावे लागणार -ॲड. निर्मला चौधरी
समाज घडविणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- काळ बदलला असून, मुलींप्रमाणे मुलांना देखील जपावे लागणार आहे. सोशल मीडियातून युवक-युवतींना आपल्या फायद्यासाठी टार्गेट केले जात आहे. आपल्या मुला-मुलींना सावध करुन पालकांना जबाबदारीची भूमिका घेण्याचे आवाहन न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. निर्मला चौधरी यांनी केले.
दरेवाडी (ता. नगर) येथील समाज घडविणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. नमो बुद्धाय महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बौद्ध विहारमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. चौधरी बोलत होत्या. यावेळी मराठी मिशनच्या प्राचार्या डॉ. विजया जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, कॉन्स्टेबल तृप्ती कांबळे, आरोग्य सेविका संप्रीता पंडित, दरेवाडीच्या सरपंच स्वाती बेरड, समुपदेशन केंद्राच्या शकुंतला लोखंडे, महिला पोलीस नाईक मोहिनी कर्डक, शिक्षिका संगीता कराळे, कराळे मॅडम, सुनीता धनवटे, मनपा महिला सबलीकरणच्या प्रमुख रेवती धापटकर, उपसरपंच अनिल करांडे, तथागत बुध्दिस्ट सोसायटीचे संजय कांबळे, भांड सर, संगीता केदार आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.
पुढे ॲड. चौधरी म्हणाल्या की, पालकांना आपली भूमिका बदलून मुला-मुलींमध्ये मित्रत्वाचे नाते निर्माण करावे लागणार आहे. सोशल मीडियामुळे मुलांवर वाईट संस्कार झपाट्याने होत आहे. वाईट गोष्टींकडे मुले-मुली लवकर आकर्षित होत आहे. चूकीच्या गोष्टीकडे वळालेल्या मुला-मुलींचे संपूर्ण आयुष्य धोक्यात येत. व्यसनाकडे देखील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात वळत आहे. ज्याप्रमाणे मुलींवर अत्याचाराचे घटना घडत आहेत, त्याचप्रमाणे मुला-मुलींची तस्करी देखील वाढली असल्याचे सांगून, त्यांनी पालकांना सजग राहण्याचे आवाहन केले.
मनपा महिला सबलीकरणच्या प्रमुख रेवती धापटकर यांनी महिलांना सबलीकरणावर मार्गदर्शन केले. सरपंच स्वातीताई बेरड सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गौतमी भिंगारदिवे यांनी उपस्थित सर्व महिलांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शुभांगी चौधरी यांनी केले.