सोशल मीडियाच्या मोहजालापासून महिला व मुलींनी सावध व्हावे -परवीन शाह
महिला शिक्षकांचा झाला सन्मान
नगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. सोशल मीडियापासून महिला आणि मुलींना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल सांगून, समाजात सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला पोलिस परवीन बशीर शाह, शबनम आलेमा, जेबा शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका रुमाना खान, ऐम इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख, उर्दू हायस्कूलचे प्र. मुख्याध्यापक मुनव्वर खान उपस्थित होते.
परवीन बशीर शाह म्हणाल्या की, सोशल मीडियाच्या मोहजालात महिला व मुली अडकत असल्याने त्यापासून गंभीर धोके निर्माण झाले आहेत. अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. महिलांवर अन्याय, अत्याचाराचे घडलेले अनेक गुन्हे हे सोशल मीडियाच्या ओळखीतून झाले असल्याचे पुढे आले आहे. यासाठी मुलींनी सोशल मीडियापासून लांब राहण्याचे व सावधानता बाळगण्याचे त्यांनी सांगितले.
शबनम आलेमा यांनी प्रत्येक समाजात थोर महिला होऊन गेल्या असून, त्यांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. हजरत आयशा (रझि), बीबी फातेमा (रझि) आणि बीबी मरियम (अलै.) यांनी महिलांना धर्माचे योग्य आचरण सांगून, आदर्श जीवन पध्दती सांगितली आहे. त्यांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
जेबा शेख यांनी मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून भवितव्य घडविताना करिअरच्या विविध वाटांची माहिती दिली. महिला दिन हा महिला सशक्तिकरण, शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, वेतन, मानधन, राजकारण, विज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये समानतेसाठी आवाज उठवण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित शाळांमधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त रेहान काझी, इनाम खान, वाजिद खान, इफ्तेखार खान यांनी सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौशीन खान यांनी केले. आभार फिरदोस खान यांनी मानले.