मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल झाल्याचा आरोप; घटनास्थळी नसलेल्यांवरचे खोटे गुन्हे मागे घ्यावे
दहशत पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला. शनिवारी (दि.26 जुलै) महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी सोनाली रोखले, ॲड. अनिता दिघे, अनिता पवार, दिव्या भवार, शारदा भुजबळ, उषा साठे, दुर्गा दळवी, रेणुका वाणे, वैशू कोरडे, रेखा पडोळे, उषा साठे, मुन्ना शेख, प्रणव भगत, अभी साखरे, रमेश साळुंखे, करण वाणी, मयूर साठे, कपिल देठे, ओंकार भवार, दिनेश देठे, प्रेम शिंदे, आकाश पवार आदी उपस्थित होते.

महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत रोहन चव्हाण, जितेंद्र चव्हाण व अविनाश हंस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची घरे आहेत. सदर व्यक्ती गुंड प्रवृत्तीचे असून, ते अनेक वर्षापासून अवैध धंदे करुन परिसरातील नागरिकांवर दहशत पसरवित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रोहन चव्हाण, जितेंद्र चव्हाण व अविनाश हंस व त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात घटनास्थळी कधीही उपस्थित नसलेले पवन पवार यांचे नाव सूडबुद्धीने गोवण्याचे काम करण्यात आलेले आहे. पवन पवार व त्यांच्या मित्रांनी हंस यांना मारहाण केलेली नाही. याउलट हंस व चव्हाण या दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या घरातील असणाऱ्या महिलांना पुढे करून पवार व त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळीवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केलेले आहे. चव्हाण व हंस यांचे शहरात अवैध सावकारकीचे धंदे असून, त्यामुळे त्यांचे अनेक वाद होत असतात. कोणत्याही वादात ते पवार व त्यांच्या कुटुंबीयांचे नाव घेऊन गुन्हे दाखल करत आहे.
22 जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती. त्यांचे कुटुंबीय नातेवाईक व मित्रमंडळी यांनी देवीचे उत्सव साजरा करीत होते. त्याचवेळी जितू चव्हाण, रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित कटानुसार पवन पवार व त्यांचे मित्र मंडळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी पवन पवार व त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता, चव्हाण व हंस यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे तोफखाना पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले. त्यांनी देवीच्या जत्रा उत्साहात विघ्न आणण्याचा प्रकार घडविला. त्याबाबत घडलेल्या प्रकारची पवार यांच्या कुटुंबीयांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून, त्याद्वारे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे
पवार यांच्या कुटुंबीयांनी रोहन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली व त्यांनी 23 जुलै रोजी पवन पवार यांच्या कुटुंबीय मित्रमंडळी यांच्या विरोधात खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. वास्तविक पाहता जितू चव्हाण, रोहन चव्हाण, अविनाश हंस आणि त्यांच्या साथीदारांनी पवन पवार यांच्या मित्रावरती तलवारी व इतर हत्यारांच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून, मारहाण व नंतर खोटे गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करत आहे. सदर प्रकरणातील आरोपींवर अनेक गंभीरगुन्हे दाखल असून, बरेच लोक त्यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यास घाबरतात. सदरील आरोपी परिसरात दहशत पसरवित असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे म्हंटले आहे.
नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोडफोड करताना फक्त गाड्या दिसल्या आहेत. या गाड्यांची तोडफोड फक्त लाकडी काठ्यानी केली आहे. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे धारदार हत्यारे नव्हती. रोहन चव्हाण व जितेंद्र चव्हाण यांनी जी धारदार शस्त्राने मारहाण केली, त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबातील युवक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. ज्या मुलांवर गुन्हा दाखल झालेले असून, ते कामानिमित्त बाहेरगावी होते. त्यांना या गुन्ह्यात गोवण्यात आले असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.