गुंडांवर ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची बहुजन मुक्ती संघटनेची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाथर्डी शहरा मधील पाथर्डी-साकेगाव-शेवगाव रस्त्यावर मीगल पंधरा ते वीस वर्षापासून कच्चे घराचे बांधकाम करुन राहत असलेल्या आदिवासी कुटुंबाची जागा खाली करण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ व महिलांशी झटापट करुन अश्लील हावभाव करणाऱ्या गुंडांवर ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संतोष चव्हाण, इंदूबाई चव्हाण, अमोल काळे, भुरण काळे, आशाबाई भोसले, शारदा भोसले, प्रियंका काळे, संज्याबाई भोसले, छकुली काळे आदी पिडीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
आदिवासी कुटुंबीय पाथर्डी शहरांमध्ये पाथर्डी-साकेगाव-शेवगाव या जुन्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सार्वजनिक रस्त्यावर झोपडी वजा कच्चे बांधकाम करुन घरे बांधून राहत आहेत. तेथील पाच ते सहा व्यक्तींनी पाठीमागची जमीन आम्ही नोटरीद्वारे विकत घेतली असून, तुम्ही निघून जाण्यासाठी धमकाविले. तेथून जाण्यास नकार दिल्याने संबंधीत व्यक्तींना या गोष्टीचा राग येऊन त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. तुमच्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचे धमकावून महिलांशी झटापट करण्यास सुरुवात केली. तर काहीजण महिलांकडे पाहून विचित्र अश्लील हावभाव करत होते. काहींनी महिलांसमोर लघुशंका केली. झोपड्या जाळण्याचे व पिण्याच्या पाण्यात विष टाकण्यासंबंधी धमकावले. सदर आरोपींनी लाकडी दांडके व लोखंडी रॉडने झोपड्यांवर मारून दहशत केल्याचा आरोप पिडीत आदिवासी कुटुंबीयांनी केला आहे.
यापूर्वी देखील सदर प्रकरणी दमबाजी करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांनीच आदिवासी कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करुन दोन दिवसाच्या आत जागा खाली करायची दमदाटी करून निघून गेले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यास गेले असता, तक्रार दाखल करून न घेता फक्त जबाब लिहून घेऊन परतवून लावल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणातील आरोपींवर यापूर्वी धमक्या देणे, धान्याचा काळाबाजार करणे, नकली दारू विकणे, भेसळयुक्त डिझेल तयार करणे, खंडणी घेणे अशा प्रकारचे विविध गंभीर गुन्हे दाखल आहे.
पाथर्डी पोलीस स्टेशन समोर चार दिवसापासून पिडीत आदिवासी कुटुंबीय गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी ठाण मांडून बसले होते. परंतु त्यांचे काही एक ऐकून न घेता फिर्याद दाखल करून घेण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.