प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
स्त्री ही कुटुंबाचा कणा -शिवानी येरकल
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्री मजबूत असेल तर कुटुंब देखील मजबूत बनते. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम झाल्यास समाजाचा सर्वांगीन विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर कु. शिवानी येरकल यांनी केले.
प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्यावर घेण्यात आलेल्या व्याख्यानात येरकल बोलत होत्या. गुलमोहर रोड, येथील कमलाबाई नवले सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उपाध्यक्षा कविता दरंदले, सचिव ज्योत्स्ना कुलकर्णी, सल्लागार विद्या बडवे, संस्थापिका अलकाताई मुंदडा, सचिव शकुंतला जाधव, खजिनदार मेघना मुनोत, छाया राजपूत, मायाताई कोल्हे, अनिता काळे, स्वाती गुंदेचा, हिरा शहापुरे, रजनी भंडारी, सुजाता पुजारी, शोभा कानडे, शशिकला झरेकर, आरती थोरात आदींसह महिला उपस्थित होत्या.
येरकल पुढे म्हणाल्या की, महिलांनी आरोग्य जपावे. महिलेचे आरोग्य उत्तम राहिल्यास कुटुंबाचे ते उत्तमपणे देखरेख करु शकते. प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी चांगल्या आरोग्याची गरज आहे. महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून उंच भरारी घ्यावी. स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. युगंधरा मिसाळ म्हणाल्या की, महिलांमध्ये व्यायामाचा अभाव व वाढते वजन ही मोठी समस्या आहे. यासाठी नियमीत व्यायाम व योग्य आहार महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करुन योग्य आहार, व्यायाम व योगाबद्दल मार्गदर्शन केले. रोटरी क्लबच्या सचिवपदी स्वाती गुंदेचा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मायाताई कोल्हे यांनी ओघळलेले कान चिकटवण्याचे काम केले.
प्रास्ताविकात विद्याताई बडवे यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रुपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. महिलांसाठी यावेळी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्यांना ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका कासट यांनी केले. आभार कविता दरंदले यांनी मानले.