जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर शाखेचा सेवा सप्ताहाचा उपक्रम
जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास रक्तदाब मॉनिटरची भेट
आधुनिक जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे -संगीताताई भोसले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिलांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी विशेष आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गरोदर माता, बाळंतीण महिला तसेच किशोरवयीन मुलींना आरोग्य तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शहरातील जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका संगीताताई गणेश भोसले, मीनाताई संजय चोपडा व जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख, जायंट्स ग्रुपचे अभय मुथा, अमित धोका, नूतन गुगळे, आयटीआय संस्थेच्या देशमुख मॅडम, सौ. पुरी आदी उपस्थित होत्या.
संगीताताई भोसले म्हणाल्या की, आधुनिक जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा कर्करोग अशा आजारांचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक असून, अशा शिबिरांमुळे महिलांना योग्य वेळी उपचार मिळाल्यास भविष्यातील धोके टाळता येऊ शकणार असल्याचे ते म्हणाले.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख यांनी सांगितले की, या शिबिरांमुळे किशोरवयीन मुलींना आरोग्य व स्वच्छतेबाबत योग्य मार्गदर्शन मिळते. तसेच गरोदर व बाळंतीण मातांची तपासणी झाल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले.
जायंट्स ग्रुपतर्फे डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर हे उपकरण जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यात आले. व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी तंबाखू व सिगारेटच्या दुष्परिणामांवर आधारित पोस्टरचे यावेळी विमोचन करण्यात आले. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी करून उपचार केले. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री रोराळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख, डॉ. कटारिया, आहारतज्ज्ञ नम्रता मकासरे, दंततज्ज्ञ डॉ. विश्वजित देशमुख, नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. कमल गायकवाड, योगतज्ज्ञ डॉ. सुरेखा खोसे, मेघांजली मध्येतू, एक्स रे टेक्निशीयन अच्युत घुमरे, क्षयरोग विभागाचे अमोल पागिरे, शीतल नरवडे तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ सहभागी झाले होते.
जायंट्स ग्रुप गेल्या 40 वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवीत आहे. सेवा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, जनावरांची मोफत तपासणी, वृक्षारोपण, अंमली पदार्थविरोधी जनजागृती, स्तनाचा कर्करोग जनजागृती तसेच मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा यांसारखे उपक्रम घेण्यात आले असल्याची माहिती संजय गुगळे यांनी दिली.