• Wed. Feb 25th, 2026

निमगाव वाघात स्त्री जन्माचे स्वागत

ByMirror

Jul 13, 2024

पद्मश्री पोपट पवार यांनी केला कन्यारत्न झालेल्या मातेचा सत्कार

स्त्री भ्रुण हत्या, ही विघातक प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार आवश्‍यक -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर चिंताजनक असताना, नुकतेच कन्यारत्न झालेल्या स्मिता राहुल जाधव या मातेचा पद्मश्री पोपट पवार यांनी सत्कार केला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, तुकाराम फलके, साहेबराव बोडखे, कुंदा फलके, नामदेव फलके आदी उपस्थित होते.


पद्मश्री पोपट पवार यांनी समाजात स्त्री जन्माचे स्वागत होणे गरजेचे आहे. मुलींचा कमी होत चाललेला जन्मदर चिंताजनक असून, अशी परिस्थितीत समाजात जागृती होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्त्री ही जननी असून, ती कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. बहिण, आई, पत्नी म्हणून स्त्री समाजात वावरत आहे. मात्र मुलगी म्हणून नाकारण्याचे पाप केले जात आहे. समाजात आजही स्त्री भ्रुण हत्येच्या घटना घडत असून, ही प्रगती की अधोगती हे विचार करण्याची गरज आहे. जी स्त्री प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरत असताना आज तिच्या जन्मावरच गदा येत आहे. ही विघातक प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकर घेण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *