दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पादुका पूजन व पद्यपूजन विधी उत्साहात
समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला धर्म, राष्ट्रभक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला -ज्योत्स्ना मुंगी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार परिसरात सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पवित्र पादुकांचे आगमन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी यांच्या वतीने या पादुकांचे स्वागत भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
ज्योत्स्ना मुंगी यांच्या निवासस्थानी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे आगमन होताच पादुकांच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी श्रद्धेने दर्शन घेतले. या वेळी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे पूजन नेहा मुंगी व जान्हवी मुंगी यांच्या हस्ते पार पडले. पद्यपूजनाचा विधी क्षीरसागर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमास श्रीपाद मुंगी, स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अमित खामकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. विलास देशमुख, चेतन वसगडेकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या सुशीला मुळे, संगीता मुळे, नीलिमा धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच योग गुरू रामचंद्र लोखंडे हे सपत्नीक उपस्थित होते. भाविकांनी ‘श्री राम जय राम जय जय राम’ या नामघोषात पादुकांचे दर्शन घेतले.
ज्योत्स्ना मुंगी म्हणाल्या की, सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पवित्र पादुकांच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तीने संचारला. या पादुकांच्या स्वागताचे भाग्य लाभले हे महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला धर्म, राष्ट्रभक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांवर चालणे, हेच आजच्या काळातील खरे समाजकार्य आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अध्यात्मिक मूल्यांची फार मोठी गरज आहे. अशा पवित्र पादुकांच्या दर्शनाने मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनात योग्य दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
