अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने घरा पर्यंत आली पाण्याची लाईन
पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांच्या डोक्यावरचा हंड्यांचा भार झाला कमी
नगर (प्रतिनिधी)- तब्बल 20 वर्षांपासून इंगळे वस्ती आणि पंचशील वाडी परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेला पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माजी नगरसेवक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून या भागात नव्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांच्या डोक्यावरचा हंड्यांचा भार कमी झाला आहे.
इंगळे वस्ती व पंचशील वाडी या भागातील नागरिकांना मागील 15 ते 20 वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत होता. या भागात पाईपलाईन नसल्यामुळे महिलांना आणि लहान मुलांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत होते. अनेक वेळा स्थानिकांनी तक्रारी करूनही यावर ठोस उपाययोजना झाल्या नव्हत्या. मात्र, माजी नगरसेवक अनिल शिंदे यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत निधी उपलब्ध करुन पाण्याची पाईपलाईन टाकून दिली.
केडगाव येथील मुख्य पाण्याच्या टाकीतून या भागासाठी विशेष पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या कामाची पाहणी करून पाईपलाईनचे वॉशआऊटही करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या घरा समोर प्रथमच पाईपलाईनद्वारे पाणी येऊ लागले. यावेळी माजी नगरसेवक अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, मनपाचे अभियंता गीते, ठेकेदार मोडवे, अक्षय कोंडवार, आकाश निर्भवणे, आशिष शिंदे, ओंकार शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीप्रश्न सुटल्याने महिलांसह नागरिकांनी आनंद व्यक्त करत अनिल शिंदे यांचे विशेष आभार मानले.
अनिल शिंदे म्हणाले की, प्रभाग क्र. 15 मधील विविध नागरी प्रश्न सोडविण्याचे काम करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करुन प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यात आली. कामाचे नियोजन करुन प्रभागातील सर्व मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले आहे. या भागातील महत्त्वाचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर लवकरच ड्रेनेज लाईन व काँक्रिटीकरणाचे काम देखील लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.