• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

उमेद फाऊंडेशनच्या वतीने युवकांमध्ये मतदार जागृती

ByMirror

Apr 13, 2024

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा संयुक्त उपक्रम

महापुरुषांच्या प्रतिमा महाविद्यालयास भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने तारकपूर येथील प्रगत कला महाविद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन युवकांमध्ये मतदार जागृती अभियान राबवून त्यांना सक्षम लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजविण्याचे आवाहन करण्यात आले. तर फाऊंडेशनच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमा महाविद्यालयास भेट देण्यात आल्या.


डॉ. भास्कर रणनवरे यांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रावसाहेब काळे, युवा उद्योजक विनोद साळवे, उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, सल्लागार ॲड. दीपक धिवर, सदस्य विजय लोंढे, विद्यालयाचे प्राचार्य महावीर सोनटक्के, नुरिल भोसले, चंद्रकांत देठे, किरण मते, दिनेश अष्टेकर आदींसह मोठया संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.


डॉ. भास्कर रणनवरे यांनी महापुरुषांचा त्याग, निष्ठा व समाजासाठी त्यांनी दिलेले योगदानाची जाणीव ठेवून सामाजिक कर्तव्य बजवावे. आदर्श समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार देण्याची गरज आहे. या विचाराने सशक्त भारत घडणार असल्याचे सांगितले.


अनिल साळवे म्हणाले की, मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे. आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून आल्यास त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सुटतील. मतदान समाजाचे भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरत असून, मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थेने घेतलेल्या मतदार जागृती अभियानात सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावीर सोनटक्के यांनी केले. आभार सचिन साळवी यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *