निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटी व एकता फाऊंडेशनच्या वतीने कार्याचे कौतुक
सोनवणे यांचे कार्य शेतकरी, सभासद व सोसायटीच्या हितासाठी -अतुल फलके
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटी व एकता फाऊंडेशनच्या वतीने सोसायटीचे सचिव विजय हरीभाऊ सोनवणे यांची नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पर्यवेक्षकपदी (सुपरवायझर) नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन अतुल फलके यांच्या हस्ते विजय सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सोनवणे यांनी यापूर्वी सोसायटीच्या सचिवपदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने पार पाडली असून, त्यांच्या कामकाजाची दखल घेऊनच त्यांची नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पर्यवेक्षकपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चेअरमन अतुल फलके म्हणाले की, विजय सोनवणे हे मेहनती, अभ्यासू व सहकार क्षेत्रातील नियमांचे काटेकोर पालन करणारे अधिकारी आहेत. सचिव म्हणून त्यांनी शेतकरी, सभासद व सोसायटीच्या हितासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा लाभ नगर तालुक्यातील सोसायट्यांना होणार असून ही निवड निश्चितच अभिमानास्पद आहे.
सत्काराला उत्तर देताना विजय सोनवणे म्हणाले की, माझ्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी मोठी असून ती प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सहकार चळवळ बळकट करणे, सभासदांच्या अडचणी सोडविणे व पारदर्शक कारभार ठेवणे हेच उद्दिष्ट राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर या यशामागे सोसायटीचे पदाधिकारी, सहकारी व ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
या सत्कार सोहळ्यास व्हाइस चेअरमन संजय डोंगरे, अनिल पाटील फलके, अजय ठाणगे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अनिल डोंगरे, संजय फलके, अरुण कापसे, वैभव पवार, स्वप्निल डोंगरे, भरत बोडखे, सुरेश काळे, रामदास कासार, प्रताप कार्ले, तुळशीराम बोरुडे, बाळासाहेब साठे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
