• Thu. Jan 22nd, 2026

घर घर लंगर सेवेच्या वतीने वीर बालदिवस साजरा

ByMirror

Dec 27, 2024

धर्मासाठी शहीद झालेल्या गुरुगोविंद सिंहजी यांच्या चार सुपुत्रांना अभिवादन

देशभरातील बालकांनी धर्माचा अभिमान बाळगून प्रेरणा घ्यावी -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्रबाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह सिंहजी यांच्या शहीद दिनानिमित्त घर घर लंगर सेवेच्या वतीने तारकपूर येथील अन्न छत्रालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. धर्मासाठी बलिदान दिलेल्या चारही शूरवीर बालकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित बालकांनी गीत सादर करुन जो बोले सो निहाल, सत श्री अकाल!… वाहे गुरु जी की खालसा, वाहे गुरु जी की फतेह!….चा जयघोष केला.


वीर बालदिवस निमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते बालकांना अल्पोपहार व धर्मासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर बालकांच्या जीवनावर पुस्तकांची भेट देण्यात आली. याप्रसंगी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, जगतीतसिंग गंभीर, राजेंद्र कंत्रोड, मुन्नाशेठ जग्गी, प्रशांत मुनोत, गुलशन कंत्रोड, सुनिल छाजेड, कैलाश नवलानी, सुनिल थोरात, चिंटू गंभीर, कुणाल गंभीर, सोनू गंभीर, सोमनाथ चिंतामणी, मयुर मुलतानी, डॉ. संजय असनानी, राजू जग्गी, सतीश गंभीर, हरभजन धुप्पड, किशोर खुराणा आदींसह समाजबांधव व लंगर सेवेचे सेवादार उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, आजच्या युवकांसह बालकांना शूरवीरतेची प्रेरणा देणारा आजचा दिवस आहे. गुरुगोविंद सिंह यांचे वारसदार असलेल्या लहान मुलांनी धर्मासाठी बलिदान दिले. अल्पावयातच ते शहीद झाले. शीख धर्मावर देखील औरंगजेबने अतिक्रमण केले होते. त्याने चार मुलांना क्रूरपणे शहीद केले. वीर बालकांनी धर्मांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. वीर बालकांच्या स्मरणार्थ देशात वीर बालक दिन साजरा केला जात आहे. देशभरातील बालकांनी धर्माचा अभिमान बाळगून प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, आपल्या धर्मासाठी कुठल्याही धमकीला भिख न घालता आपले प्राण अर्पण करून सर्वात लहान बालके शहीद झाले. त्यांनी समंजसपणा, निर्भयपणा आणि सिख नेतृत्वाने बनलेल्या अजोड नायकाचे वैशिष्ट्य दर्शविले, आपले आजोबा गुरू तेग बहादूर प्रमाणे त्यांनी धर्म परिवर्तण ऐवजी आपले जीवाचे बलिदान दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनक आहुजा यांनी धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले आहे. हे बलिदान व त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *