दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.2 डिसेंबर) व मंगळवारी (दि.3 डिसेंबर) दोन दिवसीय जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा पार पडणार आहे.
सोमवारी चित्रवाचन, ओष्टवाचन, चित्रकला व रांगोळी स्पर्धा होणार आहे. मंगळवारी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली जाणार असून, या प्रभात फेरीचे प्रारंभ जिल्हा समाजकल्याण अधिकारी (जिल्हा परिषद) देविदास कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. प्रभात फेरीनंतर दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक डॉ. दिपक अनाप दिव्यांगांकरीता विविध शासकीय योजना व लाभ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळद घाट यांच्या वतीने विद्यालयातील गरजू शालेय कर्णबधिर विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. दुपार सत्रात विद्यालयात विविध क्रिडा स्पर्धा व सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर इंटिग्रीटीचे पदाधिकारी, सदस्य व विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.