वयात येणाऱ्या किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन; गावातील महिला पालक व शिक्षकांचा सत्कार
महिला दिनाचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्री नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल कंपनी, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रमाने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलींसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना किशोरवयीन मुलींसाठी वयात येताना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी गावातील महिला पालक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अमोल वाबळे, तृप्ती वाघमारे, योगिता भिंगारदिवे, जयप्रकाश राऊत, निकिता रासकर, तेजस केदारी, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे आदींसह शालेय शिक्षिक, माता पालक व शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी शालेय मुली पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी स्वच्छता अभियान देखील राबविले. याप्रसंगी मुलींसाठी मेहंदी, रांगोळी, संगीत खुर्ची व चित्रकला स्पर्धा रंगली होती. यामधील विजेत्या मुलींना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
योगिता भिंगारदिवे यांनी किशोरवयीन मुली वयात येताना मासिक पाळी व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी वयात येताना शारीरिक व मानसिक बदलाची सविस्तर माहिती देऊन शारीरिक आरोग्यासाठी स्वच्छता पाळण्याचे आणि मासिक पाळीत योग्य सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे आवाहन केले. यावेळी मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.
पै. नाना डोंगरे म्हणाली की, महिला व मुलींवर वाढते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे काळाची गरज बनली आहे. मुली सक्षम झाल्यास गंभीर परिस्थितीला त्यांना तोंड देता येणार आहे. मुलींनी कराटे, ज्युदो, कुस्ती आदी खेळातून स्वसंरक्षणाचे धडे घेतल्यास उगारले गेलेल्या हाताला परतवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम कांडेकर यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, भाऊराव वीर, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.