आंनद योग केंद्रात रंगला हळदी कुंकू कार्यक्रम
डॉ. पूजा कासवा यांनी दिला महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश
नगर (प्रतिनिधी)- महिलांना निरोगी आरोग्यासाठी योग-प्राणायामचे वाण देवून सावेडी येथील आंनद योग केंद्रात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. वर्षभर निरोगी आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या आंनद योग केंद्राच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमात डॉ. पूजा कासवा यांनी महिलांना थायरॉईड, मेनोपॉज, ऑस्टिपोलीसिस या आजारांवर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, टी 3 ,टी, हार्मोन्स असंतुलित झाले की थायरॉईड होतो. भारतात चार कोटी पेक्षा जास्त लोकांना थायरॉईड आहे. हायपो थायरॉईड मध्ये मेटाबॉलीजम कमी होऊन वजन वाढते. हायपर थायरॉईड मध्ये मेटाबॉलीजम वाढून वजन कमी होते. थायरॉईड ग्रंथी शरीराची मॅनेजर असून, ते चांगले राहण्यासाठी नारळ, नारळाचे तेल, अक्रोड, दूध, दही, पनीर, तूप खावे. सोयाबीन, पत्ताकोबी, फुलकोबी खाणे टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.
ऑस्टियोपोरोसिस मध्ये वय वाढल्याने हाडांची झीज होऊन हाडे ठिसूळ होतात. शरीराला दररोज 1 हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. शंभरग्रॅम नाचणी मध्ये 300 ग्रॅम कॅल्शियम मिळते. कॅल्शियम शरीरात शोषणासाठी डी व्हिटॅमिनची आवश्यकता असते. दररोज 15 ते 20 मिनिटे सूर्य प्रकाश घ्यावा. मेनोपॉज मध्ये एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, हार्मोन्स कमी होतात. घाम येणे, वजन वाढणे, चिडचिड होणे, मूड जाणे, युरीन कंट्रोल नसणे अशी लक्षणे दिसतात. योग, व्यायामाने एन्डोर्फीन्स, सेरोटेनिन, डोपामाईनहार्मोन्स वाढतात. मेनोपॉजचा त्रास कमी होत असल्याची माहिती डॉ. कासवा यांनी दिली.
यावेळी सादर करण्यात आलेल्या योगा डान्सचा आनंद उपस्थित महिलांनी घेतला. अलका कटारीया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अपेक्षा संकलेचा यांनी महीलांसाठी मनोरंजनात्मक व बौद्धिक स्पर्धा घेतल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उषा पवार, सोनाली जाधववार, पूजा ठमके, प्रतिक्षा गीते, रेखा हाडोळे, स्वाती वाळुंजकर, संगीता जाधव यांनी परीश्रम घेतले.