आप्पासाहेब शिंदे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची शिक्षकांमधून मागणी
हक्काचा शिक्षक आमदार होण्यासाठी एकवटले शिक्षक
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा पार पडली. यामध्ये विधानपरिषद निवडणुकीमध्ये शिक्षकांचा हक्काचा आमदार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीचा नारा दिला. तर टीडीएफच्या वतीने आप्पासाहेब शिंदे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविण्याचा सूर शिक्षकांमधून उमटला.
संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात ही सभा झाली. या सभेत नवीन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. फेडरेशनचे अध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेप्रसंगी टीडीएफ चे अध्यक्ष एम.एस. लगड, सचिव मुस्ताक सय्यद, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, विठ्ठलराव पानसरे, उमेश गुंजाळ, राज गवांदे, प्रशांत होन, साहेबराव सकटे, अमोल ढानगे, देवीदास पालवे, दिपक पटेकर, संजय रोकडे, गोरख निर्मळ, दिलीप डोंगरे, गणेश कुऱ्हे, अर्जुन लंगोटे, बाळासाहेब राजळे, बाळकृष्ण चोपडे आदींसह जिल्ह्यातून आलेले शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
चांगदेव कडू यांनी संघटनेचा इतिहास व संघटनेची ध्येयधोरणे यावर प्रकाश टाकला व भविष्यात टीडीएफची वाटचाल कशी असेल? याची माहिती दिली. येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिका आपला शिक्षक प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रमुख वक्त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा केली. जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, शालार्थ आयडी, शालाबाह्य कामे यावर प्रामुख्याने सभेत चर्चा रंगली होती. शिक्षण विभागात प्रलंबित कामासंदर्भात व दप्तर दिरंगाईबाबत अनेक शिक्षकांनी भावना व्यक्त केल्या. त्या संदर्भात संघटना एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा ठराव घेण्यात आला.
निवडणुका व जनगणना ही कामे राष्ट्रीय कर्तव्य असले, तरी या काळामध्ये निवडणुकीचे कामकाज करताना अनेक शिक्षकांना स्वतःच्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये आपले कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागते. परंतु जाण्या-येण्याची सोय निवडणूक शाखेकडून करण्यात येत नाही. निवडणुकीचे काम संपल्यानंतर परत घरी येण्यासाठी उशीर होत असल्यामुळे सुविधा वाढवण्यासाठी व निवडणूक कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथेच नेमणूक करण्याची मागणी शिक्षकांनी केली. तसेच पन्नास वर्षा पुढील शिक्षकांना या कामातून सूट द्यावी व महिलांची गैरसोय होऊ नये या संदर्भात देखील संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे स्पष्ट करण्यात आले.
या सभेत शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) कार्यकर्ता शिबीर घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफ यांनी एकत्रितपणे काम करण्याचे व येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये शिक्षकांचा हक्काचा आमदार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने वाटचाल करण्याचा संकल्प केला.