कामगारांच्या हिताचा निर्णयासाठी युनियनची एकजुट
कामगारांना 25 ते 30 हजार वाढीव पगार, आरोग्यसेवा व घरकुल योजनेची मागणी
कामगारांच्या घामाचा दर ठरविण्याचा हक्क फक्त कामगारांनाच -कॉ.ॲड. सुधीर टोकेकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची बैठक बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) कार्यालयात पार पडली. या बैठकीत अवतार मेहेर बाबा ट्रस्ट व कामगारांदरम्यान युनियनशी होणाऱ्या नवीन कराराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. युनियनला विश्वासात घेऊन करार होणार आहे, अन्यथा आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा युनियनने ट्रस्ट प्रशासनाला दिला आहे.
बैठकीचे अध्यक्षस्थान लाल बावटा जिल्हा सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर यांनी भूषवले. यावेळी अवतार मेहेर बाबा कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, सौ. सी. एस. देशमुख, सुभाष शिंदे, विजय भोसले, सुनिता जावळे, चंद्रकला देशमुख, रामदास कल्हापुरे, राजेंद्र मोरे, दिगंबर माने आदी उपस्थित होते.
अवतार मेहेर बाबा ट्रस्टशी युनियनचा सन 2023 ते 2026 कालावधीचा विद्यमान करार मार्च 2026 मध्ये संपुष्टात येणार आहे.त्याआधी नवीन कराराची रूपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. कामगारांच्या हितासाठी यावेळी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर 25 ते 30 हजार रुपये वाढीव पगार, घरकुल योजना तत्काळ राबविण्याची मागणी, 24 तास मोफत आरोग्यसेवा अवतार मेहेरबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करणे, कामगार प्रतिनिधीला ट्रस्टच्या विश्वस्त पदावर स्थान देणे, बोनस रकमेतील वाढ करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आदी प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.
युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार म्हणाले की, अवतार मेहेर बाबा ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा सन्मान आणि स्थैर्य आम्हाला महत्त्वाचे आहे. युनियनच्या माध्यमातून अनेक समस्या सुटल्या आहेत आणि कामगारांचा आत्मविश्वास वाढला आहे.एकजुटीने लढल्यास हा नवीन करार कामगारांच्या हिताचा ठरणार असल्याचे ते म्हणाले.
कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, अवतार मेहेर बाबा ट्रस्टचा पाया हा कामगारांच्या घामावर उभा आहे. मात्र वर्षानुवर्षे राबणारे कामगार त्यांच्या हक्कापासून वंचित राहत आहे. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी वाढीव पगाराची गरज आहे. कामगारांच्या घामाचा दर ठरविण्याचा हक्क फक्त कामगारांनाच आहे. यासाठी सर्व कामगारांचा हिताचा विचार करुन करार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.