इतरही काही संचालक छुप्या पद्धतीने स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा प्रचारात सक्रीय असल्याचा दावा
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 23 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये 2003 साली स्थापन झालेल्या पुरोगामी सहकार मंडळाचे त्यावेळी असलेले संस्थापक संचालक आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये सत्ताधारी विद्यमान संचालकांनी राजेंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर मंडळात प्रवेश करून स्वाभिमानी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला आहे.

स्थापनेपासून असणारे अनेक सोसायटीचे सभासद व संचालक यांनी स्वाभिमानी मंडळात प्रवेश केला असून, या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन पॅनल किमान 1 हजार मताने निवडून येणार असल्याची अपेक्षा पुरोगामी मंडळ स्थापन करण्यात पुढाकार घेतलेले माजी संचालक विलास भांड यांनी व्यक्त केली आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी मंडळातून मा. चेअरमन व विद्यमान संचालक सुरेश मिसाळ, मा. व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक सत्यवान थोरे, माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक ज्ञानेश्वर काळे, विद्यमान संचालक बाळासाहेब सोनवणे, माजी संचालक भीमराज खोसे, विनायक उंडे, कल्याण ठोंबरे, शिवाजी वाकचौरे, सखाराम चासकर यांनी स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश केला आहे. विविध संघटनाचे उमेदवार असलेल्या परिवर्तन पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. आमचे मंडळच खऱ्या अर्थाने पुरोगामी सहकारी मंडळ असून भ्रष्ट नेतृत्वाला आम्ही या मंडळातून काढून टाकले आहे. त्यामुळे या भ्रष्ट नेतृत्वाच्या ताब्यातून ही संस्था बाहेर काढायचे असेल तर परिवर्तन पॅनलला सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन मा. व्हॉईस चेअरमन ज्ञानेश्वर काळे यांनी केले आहे. या निवडणुकीत माझ्याबरोबर अनेक संचालकांनी परिवर्तन मंडळात प्रवेश केला असून, इतरही काही संचालक छुप्या पद्धतीने स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा प्रचार करीत असून, त्यामुळे परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित असल्याची माहिती काळे यांनी दिली.