दुकाने बंद ठेवून व्यापारी दु:खात सहभागी
बाजारपेठेत शोककळा; सर्व व्यवहार ठप्प
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर कापड बाजार, मोची गल्ली मधील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवारी (दि.2 मे) सकाळपासूनच बाजारपेठेत गहिवरलेले वातावरण होते. दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत आपले दुःख व्यक्त केले.
मोची गल्लीतील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आपला व्यवसाय बंद ठेवला होता. या बंदसाठी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख यांनी आवाहन केले होते, ज्याला संपूर्ण व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अरुणकाका जगताप यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. दुकाने बंद असल्यामुळे कापड बाजार आणि मोची गल्लीत नेहमीचा गजबजाट दिसून आला नाही. बाजारपेठेत शुकशुकाट होता.
अरुणकाका जगताप यांचे बाजारपेठेतील प्रत्येक जाती-धर्माच्या व्यापारी आणि दुकानदारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान राहिले. त्यांच्या निधनाने शहराचे मोठे नुकसान झाले असून, दूरदृष्टीचा नेता गमावला असल्याची भावना मन्सूरभाई शेख यांनी व्यक्त केली.