उपस्थितांनी केला शोक व्यक्त
शिवाजीराव यांचे कार्य, साधी राहणी आणि समाजाशी असलेले नाते आजही लोकांच्या मनात जिवंत -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार शिवाजी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या भावपूर्ण कार्यक्रमात कर्डिले यांच्या समाजकारणातील कार्य, जनतेशी असलेला आत्मीय संवाद आणि त्यांची कार्यशैली यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. तर त्यांच्या जुन्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, दीपकराव धाडगे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीपराव ठोकळ, मनोहरराव दरवडे, रमेश वराडे, रतन मेहेत्रे, दीपकराव घोडके, अभिजीत सपकाळ, जहीर सय्यद, अविनाश जाधव, अशोकराव पराते, संतोषशेठ लुनिया, सरदारसिंग परदेशी, शेषराव पालवे, मुन्ना वाघस्कर, रमेश कोठारी, कोंडीराम वाघस्कर, सुहास देवराईकर, मेजर नवनाथ वेताळ, दशरथराव मुंडे, सखाराम अळकुटे, रामनाथ गर्जे, योगेश चौधरी, शिरीष पोटे, दीपक अमृत, विकास निमसे, दीपक बोंदर्डे, अजय खंडागळे, देविदास गंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले शिवाजीराव कर्डिले मंत्रीपदापर्यंत पोहोचले. ते केवळ राजकारणी नव्हते, तर जनतेच्या मनात घर करणारे नेते होते. त्यांचे कार्य, त्यांची साधी राहणी, आणि समाजाशी असलेले नाते आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. गेल्या काही महिन्यांत माजी आमदार अरुणकाका जगताप आणि आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने शहर आणि जिल्हा दोन्ही पोरके झाले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दोन्ही परिवारांच्या पाठीशी उभे राहावे, हीच या दोन नेत्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिनशेठ चोपडा यांनी सांगितले की, शिवाजीराव कर्डिले हे राज्यभर दूधवाला आमदार म्हणून प्रसिद्ध होते. बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून मंत्रीपदापर्यंत पोहोचत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची पकड होती. त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख, संवेदनशील आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात संजय भिंगारदिवे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, संतोष हजारे, आणि विलास आहेर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर शिवाजीराव यांनी आपल्या कार्यातून मोठा शेतकरी वर्ग आपल्याशी जोडला. जनतेचा विश्वास संपादन करून प्रत्येकाच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले. 
राजकारण आणि समाजकारणाचा उत्तम मेळ घालत त्यांनी समाजात आपली पकड निर्माण केली. त्यांचे राजकारण समाजाभिमुख होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या श्रध्दांजली सभेने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
