पंचवटी श्रीराम मंदिर परिसरात महिलांच्या हस्ते रोपांची लागवड
महिलांनी पुढे येऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे -साधना कुकडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त सावेडी येथील पंचवटी परिसरातील श्रीराम मंदिरात महिलांच्या सहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. महिलांच्या हस्ते जास्वंदाच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या व उपक्रमशील शिक्षिका साधना कुकडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात नगरसेविका दिपालीताई बारस्कर यांच्या हस्ते जास्वंदाच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपस्थित महिलांनीही उत्साहाने वृक्षारोपण करून परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प केला. पर्यावरण रक्षणासोबतच समाजात महिलांची भूमिका अधिक मजबूत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेविका दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर शहरातील पर्यावरण अधिक निरोगी व समृद्ध होईल. स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरणात जगणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे आणि तो टिकवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे.
सामाजिक कार्यकर्त्या साधना कुकडे यांनी महिला दिनाच्या महत्वाबद्दल सांगताना सांगितले की, महिला दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजाला संवेदनशील करण्याचा आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा दिवस आहे. प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. महिलांच्या सहभागातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. पर्यावरण संवर्धनासारख्या उपक्रमांमध्ये महिलांनी पुढाकार घेतल्यास समाजात जागरूकता अधिक प्रभावीपणे निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, झाडे ही पृथ्वीची खरी संपत्ती आहेत. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटणारी हरितसंपदा या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनाला प्राधान्य दिले पाहिजे. महिलांनी पुढे येऊन पर्यावरणाच्या जतनासाठी काम केले तर समाजात निसर्गाबद्दलची जाणीव अधिक दृढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला सौ. शिदोरे, मंजूषा कुलकर्णी, अलका वाघ, हिरा शहापुरे, मीना चौधरी, छाया मराठे, साळुंके, अडसूळ आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी कवयित्री रूपचंद शिदोरे यांनी स्त्रीशक्तीवर आधारित प्रेरणादायी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम मंदिराचे पुजारी कुलकर्णी यांनी केले.
