खासगी रुग्णालयावर कारवाईसाठी रिपाईचे महापालिके समोर उपोषण
पार्किंगची योग्य व्यवस्था करा, अन्यथा रुग्णालयास थलांतरित करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवर्ती व वर्दळीच्या भागात असलेल्या जुना बाजार रोड, चाँद सुलताना हायस्कूलच्या शेजारी खासगी रुग्णालयास पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रुग्णालयासमोर रस्त्यावर थेट वाहने उभी केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित हॉस्पिटलवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)च्या वतीने महापालिकेसमोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात स्वप्निल साठे यांच्यासह रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विकास पटेकर, संदीप वाघचौरे, अजय खरात, विजय शिरसाठ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर रुग्णालयाप्रकरणी यापूर्वीही तक्रारी व निवेदने देण्यात आली, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामागे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चाँद सुलताना हायस्कूल शेजारी असलेल्या या खासगी रुग्णालयात रुग्णांची नेहमीच गर्दी असते. रुग्णांच्या नातेवाइकांची चारचाकी आणि दुचाकी वाहने सर्रासपणे मुख्य रस्त्यावर लावली जातात. याच रस्त्यावर शाळा, चर्च, मंदिर आणि व्यापारी दुकाने असल्याने दिवसभर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
महत्त्वाचे म्हणजे, नियमानुसार कोणत्याही रुग्णालयाकडे स्वतःचा वाहनतळ असणे बंधनकारक आहे. मात्र, सदर रुग्णालयाने या नियमाचे उल्लंघन करत थेट रस्ताच वाहनतळ बनविला आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडी व अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
पार्किंगची सुविधा नसताना अशा रुग्णालयाला परवानगीच कशी देण्यात आली? तातडीने या प्रकरणाची चौकशी करून रुग्णालयावर कारवाई करावी, पार्किंगची योग्य व्यवस्था न केल्यास रुग्णालयास अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.