व्याज वसूली साठी 83, 88 अन्वये कारवाई करण्याचे लेखी आश्वासन
लेखी पत्रामुळे गोस्वामी यांचे उपोषण अखेर मागे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमत करुन पारनेर शाखेतून कोणताही अधिकार नसताना 45 लाख रुपये उचलून रकमेचा अपहार केल्याचा आरोप करुन बँकेतील रक्कमेचे व्याज वसूल करावे व फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणून 1 मार्च पासून सैनिक बँकेसमोर विनायक गोस्वामी यांनी उपोषण केले होते. सोमवारी (दि.4 मार्च) सहकार खात्याच्या आधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेऊन पारनेर येथे उपोषण स्थळी भेट देवून 45 लाख रुपये रकमेचे व्याज वसूल करण्यासाठी लेखापरीक्षण करून कलम 83, 88 ची कारवाईचे लेखी पत्र दिल्याने गोस्वामी यांनी उपोषण सोडले.
सैनिक बँकेतील आधिकारी वर्गाने पदाचा दुरुपयोग करत, अनेक वर्षे बँकेचा नियमबाह्य पैसा वापरून बँकेचे आर्थिक नुकसान केले आहे. हा बँकेच्या खातेदारांचा, ठेवीदारांचा विश्वासघात आहे. त्या रक्कमेच व्याज संबंधितांकडून वसूल करावा, कलम 83, 88 व फौजदारी गुन्हा दाखल करावा, कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरणी आरोपी कर्मचारीला नवीन संचालक मंडळाने बँकेतून बडतर्फ करावे व कर्जत येथील लेखा परीक्षण अहवालानुसार तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गोस्वामी यांनी उपोषण सुरु केले होते.
सदर मागण्याबाबत सहकार खात्याने तातडीची पावले उचलली आहेत. त्याबाबत दोषींवर लेखापरीक्षण करून कारवाई करण्याचे लेखी पत्र मिळाल्याने गोस्वामी यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी अशोक गंधाक्ते, चंद्रकांत पाचारणे, सहाय्यक निबंधक गणेश औटी, विक्रमसिंह कळमकर, मेजर मारूती पोटघन, सोपान कुलट आदी सभासद उपस्थित होते.
सैनिक बँकेत मुख्यकार्यकारी आधिकारी व पारनेर शाखा व्यवस्थपक हे संगणमताने 45 लाख रुपये वापरत होते.आम्ही तक्रार केल्यावर सदर रक्कम भरली आहे. सदर रक्कम भ्रष्टाचार करत वापरत होते हे सिद्ध झाले असून, सदर रक्कमेवरील व्याज वसूल व्हावा व जबाबदार आधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. -विनायक गोस्वामी
.