अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण
कागदोपत्री मजूर दाखवून बीले लाटल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात सुरु असलेल्या शीवपाणंद रस्त्याच्या अनागोंदी व निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामात मजूर कामावर न घेता, कागदोपत्री त्यांचे नावे दाखवून बिल काढून अपहार झाला असल्याचा आरोप करुन या प्रकरणी विभागीय स्तरावरून चौकशी होण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यात 60 गावांच्या 281 शीवपाणंद रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कामावर 25 टक्के मजूर असणे अनिवार्य असून ठेकेदार, सरपंच व रोजगार सेवक यांनी संगनमत करून त्यांच्या मर्जीतील मजुरांची नावे टाकून त्यांचे नावे पैसे काढून घेतले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून, रस्त्याचे काम शासन परिपत्रकानुसार होत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मोठ्या प्रमाणात निधी रस्त्यांच्या कामासाठी आला असून, तो चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे. सदर रस्त्याच्या कामात प्रत्येक अधिकारी, सरपंच व रोजगार सेवकांची टक्केवारी ठरली असल्याने अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहे.
या रस्त्याच्या अनागोंदी कारभाराची चौकशी विभागीय स्तरावरून होण्यासाठी समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 30 दिवसात चौकशी न केल्यास नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचे म्हंटले आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले.