भुतारे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा मनपाचा खुलासा
खोडसाळपणाने मनपाची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोप केला गेला
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- करोडो रूपये खर्च करून लाखो झाडे लावली, पण ती जगलेली कुठेही दिसत नाही! या मथळ्याखाली नितीन भुतारे यांनी दिलेली बातमीत कोणतेही तथ्य नाही. भुतारे यांनी वस्तुस्थिती न पाहता सदर तक्रार केली आहे. वास्तविक योजना व संगोपन कालावधी पूर्ण झालेला नसून, भ्रष्टाचार झाला असे म्हणता येणार नाही, असा खुलासा महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात आला आहे.
वस्तुतः सदर निविदेचे स्वरूप हे अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 मध्ये प्रत्येकी 1250 (वृक्ष लागवड संख्या) या प्रमाणे शहरात एकूण 5 हजार वृक्ष लागवड करणे व दोन वर्ष संगोपन करणे असे आहे. या कामासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी नसून महापालिकेच्या फंडातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार वृक्ष लागवडीवर करोडो रुपये खर्च करून 45 लाखाचा भ्रष्टाचार झाला असे मांडण्यात आले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 5 हजार वृक्ष लागवडी करता निविदेची एकूण रक्कम ही 75 लाख रुपये इतकी असून, यापैकी आतापर्यंत केवळ 654 वृक्षांची लागवड होऊन 6,34,380/- रुपये इतकाच खर्च झालेला आहे.
वृत्तपत्रातील बातमीनुसार प्रति झाड 1250 रुपये दर नसून प्रत्यक्षात प्रति झाड 720 रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. निविदेतील अटी शर्तीनुसार संगोपन व दोष दायित्व कालावधी हा दोन वर्षाचा असून, याकरता निविदेतील एकूण रकमेच्या 30% रक्कम ही या कलावधीकरता राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे झाडे जगतील व त्यांची वाढ होण्याच्या दृष्टीने मनपाने नियंत्रण ठेवले आहे.
मनपा मार्फत ठेकेदारास स्थळ निश्चितीकरण झाल्यानंतर खड्डे तयार करून देण्यात येणार आहे. तदनंतर ठेकेदार झाडे लावण्याचे काम करणार आहे. वास्तविक योजना व संगोपन कालावधी पूर्ण झालेले नसून, भ्रष्टाचार झाला असे म्हणता येणार नाही. मनपा मार्फत शहरात वृक्ष लागवड करून हरित शहर करण्याकडे वाटचाल होत असून, वृत्तपत्रात भुतारे यांनी प्रसिद्ध केलेला बातमीतील मजकूर हा खोडसाळपणाचा व मनपाची बदनामी करणारा आहे.