जिल्ह्यातील संस्था व मुलींना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोणी येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत मुलींसाठी अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार रंगणार असून, जिल्ह्यातील संस्था व मुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे . केंद्र शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लीगचे प्राथमिक उद्दिष्ट क्रीडा स्पर्धामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, ॲथलेटिक्सला प्रोत्साहन देणे आणि जिल्ह्यांमधील तळागाळातील क्रीडा नैपुण्य शोधणे व क्रीडा संस्था मजबूत करणे असा आहे.
स्पर्धेसाठी संपूर्ण देशातून 300 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यात अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी सोमवार दि . 30नोव्हेंबर 2025 रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन दोन गटात 14 व 16 वर्षांखालील मुलींसाठी करण्यात आले आहे . स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त संस्था व मुलींनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव व डॉ. उत्तम अनाप यांनी केले आहे.
या स्पर्धेचे आयोजन प्रवरा स्पोर्टस अकॅडमी आणि अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर ॲथलॅटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडूंना भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व भारतीय खेल प्राधिकरण (साई) मार्फत प्रमाणपत्र व मेडल्स वितरित केले जातील. तसेच भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनद्वारे नियुक्त केलेले निवड चाचणी पथक अस्मिता लीगच्या आयोजना दरम्यान प्रत्येक जिल्ह्याला भेट देऊन प्रतिभावान आणि भविष्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची निवड करतील.
तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संदीप हारदे, श्रीरामसेतू आवारी, राहुल काळे, जगन गवांदे व अजित पवार प्रयत्नशील आहेत. खेळाडू व संस्थांना खालील https://forms.gle/Qi4yKSw52pSw4HQ66 या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9923837888, संदीप हारदे 9657603732 व श्रीरामसेतू आवारी 9322015046 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
