सर्व वैद्यकीय व पुरवणी बीले अदा करण्याची शिक्षक परिषदेची मागणी
कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून कर्ज काढण्यास येत आहेत अडचणी -बाबासाहेब बोडखे
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षण विभागाकडून भविष्य निर्वाह निधीच्या मार्च 2024 अखेरच्या पावत्या मिळण्याची मागणी महाराष्ट्र राष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतनपथक अधिक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन सदर प्रश्नी निवेदन देऊन सर्व वैद्यकीय व पुरवणी बीले मिळण्याबाबतही चर्चा केली. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे राजेंद्र लांडे, शिक्षकेतर संघटनेचे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, प्रा. सुनिल शिंदे, संजय शिरसाट, दिनकर मुळे, वैभव सांगळे, रोहीदास पुंड, अशोक आव्हाड आदी उपस्थित होते.

वेतनपथक अधिक्षक म्हस्के यांनी सदर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विशेष कॅम्पद्वारे ऑफलाइन पद्धतीने पीएफच्या पावत्या दिल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले. तर वैद्यकीय देयकासंदर्भात शिक्षण उपसंचालकांशी चर्चा करून हा प्रश्न देखील मार्गी लावला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व विद्यालयांना सन 2021-22 सालापर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळालेल्या आहेत. यासाठी सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते विशेष कॅम्पद्वारे ऑनलाईन अपडेट केलेली आहेत. परंतु आजतागायत यापुढील भविष्य निर्वाह निधीच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्लिपा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून कर्ज काढायचे असल्यास सन 2021-22 सालापर्यंतचे शिल्लक रकमेवर कर्ज मंजूर केले जात असल्याच्या तक्रारी घेऊन अनेक शिक्षक, कर्मचारी संघटनेकडे तक्रार घेऊन येत आहेत. या रकमेत पुढील दोन वर्षाचा हिशोब धरला जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मार्च 2024 अखेरच्या भविष्य निर्वाह निधीच्या स्लीपा ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने विशेष कॅम्प आयोजित करून तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना मिळाव्या, जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व प्रकारच्या पुरवणी देयके, वैद्यकीय देयके व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर आणि सेवानिवृत्त यांचे रजा रोखीकरणाचे देयके लवकरात लवकर अदा करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.