महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य करण्याचा महिलांचा संकल्प
मिनाक्षी जाधव यांनी स्विकारली अध्यक्ष पदाची जबाबदारी
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात योगदान देत असलेल्या लिनेस क्लब ऑफ राजमाताच्या महिला पदाधिकारी व सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. या वर्षीचे अध्यक्षपदाची सूत्रे मिनाक्षी जाधव यांनी स्विकारली. तर महिलांनी महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला.
दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे प्रारंभ झाले. या शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इंस्टॉलेशन ऑफिसर म्हणून छायाताई राजपूत, माजी उपमहापौर गितांजलीताई काळे, यशवंती ग्रुपच्या संचालिका मायाताई कोल्हे, डिस्ट्रीक्ट पास्ट प्रेसिडेंट लतिकाताई पवार, व्हाईस डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट नीलम परदेशी उपस्थित होत्या.
छायाताई राजपूत यांनी लिनेसच्या कार्याची माहिती देऊन नियमांच्या पालन करण्याची शपथ नूतन पदाधिकारी व सदस्यांना दिली. त्या म्हणाल्या की, महिलांनी उभे केलेले सामाजिक कार्य सामाजिक परिवर्तनासाठी क्रांतीचे पाऊल आहे. सामाजिक जाणीव ठेऊन महिला योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या.
गितांजलीताई काळे यांनी शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी विविध उपक्रम लिनेसच्या माध्यमातून राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मायाताई कोल्हे यांनी वृक्षारोपण करुन त्याच्या संवर्धनासाठी ट्री गार्ड बसविणे आणि वर्षभर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.
लतिकाताई पवार यांनी लिनेसच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन लिनेसच्या माध्यमातून महिलांचे संघटन गरजूंसाठी आधार बनले आहे. शेवटच्या घटकांचा विचार करून सेवा कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नीलम परदेशी यांनी ऑल इंडिया लिनेसच्या कार्याची व्याप्ती सांगितली. यावेळी मावळत्या अध्यक्षा शोभा भालसिंग यांनी नूतन अध्यक्षा मिनाक्षी जाधव यांच्याकडे पदभार सोपविला. तसेच सचिव अजिता एडके, कोषाध्यक्षा आशा कांबळे व उपाध्यक्ष कविता दरंदले यांनी पदाची सूत्रे स्विकारली. नूतन पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला कदम यांनी केले. आभार अजिता एडके यांनी मानले.