जातीय सूडबुद्धीने केलेली कारवाई झाल्याचा आरोप; जातीय तेढ निर्माण करणाऱ्या उपशिक्षकावर कारवाईची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडे वस्तीच्या मुख्याध्यापकावर जातीय सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तर जातीवाचक शब्द उच्चारुन अपमानित केल्याबद्दल संबंधितांवर ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये शिष्टमंडळाने सदरचे निवेदन दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडे वस्तीचे उपशिक्षक पालकांमध्ये जातीय तेढ निर्माण करत आहे. तर पालक व ग्रामस्थांमध्ये माथी भडकविण्याचे काम करत आहे. शाळेतील पालकांना व ग्रामस्थांना खोटे गुन्हे दाखल करण्यास प्रवृत्त करतो. पालकांमध्ये गैरसमज निर्माण करून जातीवरुन हेतूपुरस्कर त्रास आहे. त्याने भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्याचा मुख्याध्यापक पदाचा चार्ज काढून घेण्यात आला होता. तर मुख्याध्यापक असलेल्या विलास शंकरराव पगारे यांना जातीय सूडबुद्धीने ग्रामस्थ व पालकांना भडविण्याचे काम केल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
शाळेतील सर्वात महत्त्वाचा अभिलेख असणारा जनरल रजिस्टर मध्ये त्या उपशिक्षकाने कोणतीही अधिकृत परवानगीशिवाय विद्यार्थ्यांच्या जातीमध्ये बदल केला. ही बाब उघडकीस आणल्याने त्याने आनखी त्रास देण्यास सुरुवात केली. स्थानिक पालक व ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण करुन गाव पातळीवरील वातावरण दूषित करण्याचे काम संबंधित शिक्षकाने केले आहे. 18 जुलै रोजी चार ते पाच ग्रामस्थांनी शाळेत येऊन जातीवाचक वक्तव्य करुन महार समाजाचा मास्तर शाळेतून जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका घेतली. यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने विलास पगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर मुख्याध्यापकावर जातीय सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी अन्यथा 5 ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेत आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे.