अन्यथा शिक्षक अतिरिक्त होण्याचा व विद्यार्थी लाभपासून वंचित होण्याचा धोका -बाबासाहेब बोडखे
तर मार्च 2024 अखेरच्या पीएफ पावत्या मिळण्याबाबत शिक्षणाधिकारी यांना स्मरणपत्र
नगर (प्रतिनिधी)- संच मान्यता आणि विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी 30 सप्टेंबर हाच निकष संच मान्यतेसाठी ठेवण्याच्या मागणीचे निवेदन व जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना पीएफच्या मार्च 2024 अखेरच्या पावत्या मिळण्याबाबतचे स्मरणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना देण्यात आले.
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी गायकवाड यांची भेट घेऊन सदर प्रश्नावर लक्ष वेधले. यावेळी जिल्हा कार्यवाह प्रा. शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष बबन शिंदे, प्रसाद सामलेटी, कार्याध्यक्ष दिपक आरडे, प्रा. अमोल क्षीरसागर, नामदेव गायकवाड, संदीप गोसावी, शंकर चावलवाड, सोमनाथ सुंबे, मकरंद हिंगे, राहुल मोरे, बाजीराव अनभुले, अरविंद आचारी, मनोज हिरणवाळे, संतोष खरमाळे आदी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी लवकरच शिक्षक, शिक्षकेतरांना पीएफच्या मार्च 2024 अखेरच्या पावत्या ऑनलाईन पध्दतीने मिळण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. तर 30 सप्टेंबर हाच निकष संच मान्यतेसाठी ठेवण्यासंदर्भात शिक्षण संचालकांना निवेदन पाठविण्याचे स्पष्ट केले.
शिक्षक संच मान्यता विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत मिळणारे लाभ हे 30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर दिले जातात. कारण 15 जूनला शाळा सुरू होते. त्यानंतर दीड महिना प्रवेश प्रक्रिया चालू राहते. त्यानंतर सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे जनरल रजिस्टरला नोंद घेऊन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होऊन शाळेचा पट तयार होत असतो. परंतु यावर्षीपासून शिक्षक संच मान्यता विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांतर्गत मिळणारे लाभ देण्यासाठी 30 सप्टेंबरच्या पटाऐवजी 31 जुलैच्या पटावर संच मान्यता व लाभ देण्याचे सूचित करण्यात आल्याचे समजते. तसे झाल्यास शाळेची पटसंख्या आधार अपडेट व सर्व ऑनलाईन प्रक्रिया होऊन शाळेचे ऑनलाईन पटसंख्येत तफावत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व विद्यालयांना सन 2021-22 सालापर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळालेल्या आहेत. यासाठी सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते विशेष कॅम्पद्वारे ऑनलाईन अपडेट केलेली आहेत. परंतु आजतागायत यापुढील भविष्य निर्वाह निधीच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्लिपा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून कर्ज काढायचे असल्यास सन 2021-22 सालापर्यंतचे शिल्लक रकमेवर कर्ज मंजूर केले जात असल्याच्या तक्रारी घेऊन अनेक शिक्षक, कर्मचारी संघटनेकडे तक्रार घेऊन येत आहेत. या रकमेत पुढील दोन वर्षाचा हिशोब धरला जात नसल्याचे म्हंटले आहे.
संच मान्यता आणि विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी 30 सप्टेंबर हाच निकष संच मान्यतेसाठी ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा विद्यार्थी संख्या असूनही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचा व विद्यार्थी लाभपासून वंचित होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)