श्री क्षेत्र सिरसगाव दिंडीचे दिंडीचे भक्तीमय वातावरणात स्वागत
भाविक व वारकऱ्यांमध्ये रंगला फुगड्यांचा फेर
नगर (प्रतिनिधी)- माउली… माउली… नामाचा जयघोष… तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात छत्रपती संभाजीनगर येथील श्री क्षेत्र सिरसगाव (ता. वैजापूर) येथील दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण रेल्वेस्टेशन परिसर भक्तीमय बनला होता.
दिंडीच्या स्वागतासाठी परिसरातील घरांसमोर सडा, रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा गजर करण्यात आला. दिंडीत पांढऱ्या पोशाखात भगवे ध्वज घेऊन सहभागी असलेले वारकरी, तर महिलांच्या डोक्यावर असलेल्या तुळशी वृंदावन अशा शिस्तबध्द संचलन करणाऱ्या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले.
या दिंडीत स्थानिक नागरिक, महिला व वारकऱ्यांमध्ये फुगड्यांचे फेर रंगले होते. ॲड. राजेश कावरे व सौ. संगीता कावरे यांनी ह.भ.प. संजय महाराज निंबाळकर, वीणेकरी चांगदेव महाराज भवर यांचे औक्षण करुन सत्कार केला. यावेळी रेल्वेस्टेशन, आनंदनगर परिसरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.